भाळवणी (ता. पंढरपूर) - दि.09: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगाम 2023-24 मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रती टन 2700 रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी जाहिर केले. त्याचबरोबर गत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांची प्रलंबित बिले व कामगारांचे मागील पगारासह ऑक्टोंबर,2023 पर्यतचे पगारही एकरकमी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहितीही श्री.काळे यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे की, कारखान्याचे ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार आणि कारखान्याचे कर्मचारी यांना बॉयलर प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी दिलेल्या शब्दाप्रमाणे गत गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला प्रती टन 2511 रुपये दर जाहिर करण्यात आलेला होता. निधीच्या उपलब्धतेनुसार या हंगामातील बहुतांश ऊस बिले देण्यात आलेली होती. मात्र या हंगामात कमी गळीत आणि आर्थिक अडचणींमुळे काही ऊस पुरवठादारांची बिले देण्यास विलंब झालेल्या ऊस पुरवठादारांची प्रती टन 2561 रुपये प्रमाणे आणि ज्या ऊस पुरवठादारांना प्रतीटन 2300 रुपये प्रमाणे बिले देण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांना उर्वरीत 211 रुपये प्रमाणे संपुर्ण ऊस बिले गुरुवारी (दि.9) संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जमा करण्यात आलेली आहेत. गत गळीत हंगाम 2022-23 ची निव्वळ एफआरपी प्रतीटन 2154 रुपये असतानाही कारखान्याने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांच्या घामाला योग्य् दाम देण्यासाठी प्रतीटन 407 रुपये जादा दिलेले आहेत. एफआरपी पेक्षा जादा ऊसदर देणारा सहकार शिरोमणी साखर कारखाना हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना ठरला आहे.
चालु गळीत हंगाम 2023-24 मध्ये गळीतास येणाऱ्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊसाला ऊस गळीतास आल्यापासून दहा दिवसात त्यांच्या ऊसाचे पेमेंट 2700 रुपये प्रमाणे करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर बिगर ॲडव्हान्स् ऊस वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांना 50 टक्के ऊस वाहतुकीवर आणि 20 टक्के ऊस तोडणीवर कमिशनसह त्यांची बिले रोखीने पाच दिवसात देण्यात येणार आहेत. ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार-मजुरांप्रमाणेच कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये मोलाचे योगदान राहते. त्याचाही विचार करुन संचालक मंडळाने मागील पगारासह ऑक्टोंबर,2023 पर्यतचे कामगारांचे सर्व पगार एकरक्कमी त्यांच्या बँक खातेवर जमा केलेले आहेत. यंदाच्या गळीत हंगाम 2023-24 मध्ये कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास द्यावा आणि सांघिक प्रयत्नातुन हा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही श्री.कल्याणराव काळे यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकात केले आहे.