युटोपियन शुगर्स चा अनोखा उपक्रम - ऊस तोड कामगारांच्या हस्ते केला गळीत हंगामाचा शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी) - स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेला वारसा अखंड चालवीत समाजातील उपेक्षित घटकास समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या आमचा नेहमीच प्रयत्न आज पर्यंत राहिला आहे. याच दृष्टीकोणातून आज आपण ऊस तोड कामगार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२३-२०२४ चा शुभारंभ करीत असल्याची माहिती युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, ऊसतोड कामगारांच्या पिढ्यान पिढ्या या ऊसतोड करण्यात गेल्या. पण हा वर्ग नेहमीच समाजाच्या प्रवाहापासून दूर राहिला आहे. त्यास समाजामध्ये प्रतिष्ठा देण्याची भूमिका युटोपियन शुगर्स नेहमीच घेत आहे त्यास अनुसरून आज बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून चालू गळीत हंगामाचा शुभारंभ करीत आहोत. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. ऊसाची उपलबद्धता कमी आहे. सर्वात जास्त साखर कारखाने हे आपल्याच सोलापूर जिल्ह्यात आहेत. ऊसाची वाढ पुरेश्या प्रमाणात झाली नसल्याने वजनही कमी होणार आहे त्याचा परिणाम म्हणून रिकव्हरी कमी लागेल असा अंदाज आहे. असे असतांनाही मागील १० वर्षापासून युटोपियन शुगर्सने ऊस उत्पादक यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण केले असल्यामुळे चालू गळीत हंगामासाठी जवळपास ७ हजार हेक्टर च्या नोंदी युटोपियन शुगर्स च्या शेती विभागाकडे आहेत. अद्यावत यंत्र सामग्री वापरण्यासाठी आपला कारखाना नेहमीच अग्रेसर असतो त्यामुळे वाहन काटयांच्या तपासणी/फेर पडताळणी वेळी शासनाच्या नवीन नियमा नुसार प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (SOP ) चा वापरही आपल्या कारखान्या कडून करण्यात येत आहे. कारखाना प्रशासनाने मागील वर्षी पासून गाळप क्षमते मध्ये वाढ केल्याने प्रती दिन ५२०० मे. टन गाळप करण्यात येणार आहे.
सर्वत्र सध्या ऊस दराची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत युटोपियन शुगर्स कदापि मागे असणार नाही असे सांगून परिचारक यांनी मागील गळीत हंगामामधील गाळप ऊसास प्रती मे.टन ५१ रू वाढीव दर देण्यात येणार आहे. या वाढीव दरामुळे मागील वर्षीच्या ८६०३२ या जातीच्या ऊसास रु. १०० अनुदानासह एकूण २४५१ रू. प्रती मे. टन इतका मोबदला दिला आहे. तर इतर जातीच्या ऊसास २३५१ रू. इतका दर होत आहे. तसेच चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता ही २५११ रू. पहिली उचल देणार आहे. कामगार वर्गाची ही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना ही ८.३३ % दिवाळी बोनस ही देणार आहोत.
प्रारंभी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते विधिवत मोळी पूजन करण्यात आले.सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक तसेच कल्याण नलवडे, आप्पासाहेब घाडगे यांचे समवेत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.