जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

0


          सोलापूर दि. 9 (जिमाका):-  सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करुन माल जप्त केला आहे. दि. 31 ऑगस्ट  ते दि. 07 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तेल व वनस्पती- तेलाचे एकूण 5 नमुने व वनस्पतीचे 2  नमुने,  दूध या अन्न पदार्थाचे 55 नमुने व दुग्धजन्य पदार्थाचे 18 नमुने, रवा, मैदा, आटा व इतर असे एकूण 22 नमुने तसेच तुप, खवा, पनीर- या अन्न पदार्थाचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले आहे.

          या मोहिमेत  दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी बेगमपुर (ता. मोहोळ) येथील मे. बॉम्बे स्विट मार्ट व बेकरी या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी- 40 किलो, सुमारे 10 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी मे. उत्तम चौधरी, भवानी पेठ, सोलापूर या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी- 68 किलो, किंमत रु. 17 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे . दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. भगवान राम पालिवाल या पेढीवर धाड टाकून स्पेशल बर्फी- 103 किलो, किंमत 25 हजार 750 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

      तसेच दि. 02 नोव्हेंबर 2023 रोजी मु. पो. कोंढारपट्टा (माळशिरस) येथील मे. शौर्य गुळ उद्योग या ठिकाणी धाड टाकून गुळ व साखर (अपमिश्रक)- 918 किलो, किंमत 35 हजार 125 रुपयाचा चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.दि. 07 नोव्हेंबर 2023 रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. ध्रुव एजन्सी या ठिकाणी धाड टाकून दुध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपनीचे व्हे पावडरचे एकूण 1 हजार 813 किलो सुमारे  1 लाख 59 हजार 640 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)