स्वेरीत 'सहजयोग’ वर आधारित मार्गदर्शन सत्र संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आनंदी कसे राहू ? हे पाहत असताना आपण जर नियमित योग साधना केल्यास मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या आपण आनंदी राहू शकतो आणि हे सहज शक्य आहे. जेवढी जास्त धावपळ होते तेवढीच ध्यान धारणा करणेही आवश्यक आहे. योग साधना करण्यासाठी जास्त वेळेची पण गरज नसते. योगा केल्याने मनाची एकाग्रता टिकून राहते आणि आपल्या दैनंदिन कामांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योगामुळे आपण करत असलेल्या कामातून आपल्याला पूर्णपणे समाधान मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगा केल्याने आपली मानसिकता खूप चांगली राहते. त्यामुळे आरोग्य देखील उत्तम राहते. आरोग्य उत्तम असल्यास आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. म्हणून आपल्या मनःशांतीसाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन सहजयोग साधनेचे प्रशिक्षक चंद्रकांत देवडा यांनी केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या ‘अॅन इंट्रक्शन सेशन ऑन सहजयोग’ या विषयावर मध्यवर्ती असलेल्या खुल्या रंगमंचावर आयोजिलेल्या या कार्यक्रमामध्ये सहजयोग साधनेचे प्रशिक्षक चंद्रकांत देवडा हे मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलानंतर प्रशिक्षक देवडा यांनी जीवनात ‘योगा का महत्त्वाचा’ आहे हे पटवून देताना त्यांनी कुंडलीनी शक्तीचे महत्व पटवून दिले.
यानंतर उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांकडून विविध प्रकारच्या हालचाली तथा योगाचे प्रकार करून घेतले. दैनंदिन जीवनात योगा खूप महत्त्वाचा आहे हे सांगताना प्रशिक्षक देवडा यांनी ‘कर्म योग, भक्ति योग, पर्यटन योग, विक्रम योग, क्रिया योग, राज योग, अनुसार योग, अष्टांग विन्यास योग आदी योग तसेच शिकण्यासाठी सहज सोपे, संतुलन, समाधान व आनंद यांची वृद्धी, मोफत साप्ताहिक ध्यान, तणावमुक्त जीवन, स्मरणशक्तीमध्ये वाढ, आरोग्यामध्ये सुधारणा, समाधानी जीवन, सर्व नातेसंबंधात सुधारणा आदी बाबतीत सविस्तर सांगितले. सहजयोग प्रकारात मानवात टाळूपासून तळहातापर्यंत थंड/उष्ण वाऱ्याची जाणीव होते. हा योग केल्यामुळे मनुष्याला शारीरीक व मानसिक ताण-तणावापासून मुक्ती मिळते. आज जगामध्ये ध्यानाची सर्वात जास्त प्रॅक्टिस केली जाते. या विश्वामध्ये १०० पेक्षा जास्त देशामध्ये सहजयोगाचा अभ्यास व ध्यान नियमित केले जाते. ही पूर्णतः शास्त्रिय वैज्ञानिक क्रिया आहे. सहजयोग या शब्दाचा अर्थ 'सह' म्हणजे 'सोबत' व 'ज' म्हणजे 'जन्मलेला' व 'योग' म्हणजे 'जोडले जाणे' म्हणजे जन्मापासून मानवाच्या आत माकड हाडामध्ये निद्रीस्त असलेली सुप्त कुंडलिनी शक्ती होय.’ असे सांगून जीवनात योगा केलाच पाहिजे हे त्यांनी पटवून दिले. या कार्यक्रमासाठी विजयकुमार नलगीलकर, सौ.नलगीलकर, प्रा.भूषण काळे, दिल्ली सुप्रीम कोर्टाचे अॅड.आशिष यादव, तसेच ऑस्ट्रेलिया व फ्रांस मधील सहजयोगचे अनुयायी एलिन, एरीक व सलेट, स्वेरीचे माजी विद्यार्थी बालाजी नागटिळक, तसेच स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथून मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, यांच्यासह स्वेरी अभियांत्रिकीचे सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी मानले.