पंढरपूर, दि. 18 :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी असून, यात्रा कालावधी दि.14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात.वारकरी व भाविकांकडून नामदेव पायरी व मंदीर परिसरात नारळ विक्री व फोडण्यास मनाई आहे. तसेच वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी फौजदारी संहितेच्या कलम 144 अन्वये दिनांक 22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दिनांक 22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.