पंढरपूर (प्रतिनिधी) -- श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दररोज हजारो भाविक दर्शनास येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात वृध्द, अंध, अपंग, वारकरी मोठ्या प्रमाणात येतात. त्यातील काहींना चालणेही अशक्य असते. याकरता श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चौफाळा श्रीकृष्ण मंदिरापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत रिक्षाने ने-आन करण्याची सोय करण्यात यावी अशी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, संघटक महेश भोसले, साळुंखे यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, मंदिर समिती वतीने भाविकांच्या सोयीकरता नवीन रिक्षा घेणार असून लवकरच भाविकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिर समितीला दानशूर व्यक्तीने दोन रिक्षा दिल्या असून याकरता मंदिर समितीच्या सदस्य माधवी निगडे यांच्या प्रयत्नातून दानशूर व्यक्तीने दिलेल्या रिक्षा या गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. आपण यात तातडीने लक्ष घालून भक्ताच्या सोयी करता रिक्षा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून रिक्षा अंध अपंग दमेकरी ज्येष्ठ वृद्ध नागरिक वारकरी भक्त यांची सोय करावी. मंदिर समितीच्या आवारात म्हणजेच रुक्मिणी पटांगण येथे एक व महाद्वार पोलीस चौकी या ठिकाणी एक अथवा तुकाराम भवन समोर रिक्षा चालकासह पहाटे पाच वाजलेपासून रात्री मंदिर बंद होईपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात असेही सुचवण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून भाविकांच्या सेवेसाठी असलेल्या रिक्षा बंद असल्याने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या वृद्ध,अंध्य, अपंग, दमेकरी ज्येष्ठ नागरिक यांना चालण्यास त्रास होत असल्याने व ऐनवेळी रिक्षा उपलब्ध होत नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. याकरता मंदिर समितीने त्वरित लक्ष घालून रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात असेही सुचवण्यात आले. या रिक्षा वरील ठिकाणी उभ्या असताना त्या रिक्षा चालकाचे भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल नंबर व्हीआयपी गेटवर असलेल्या अधिकाऱ्याजवळ देण्यात यावेत उपलब्ध असलेला रिक्षा चालक हा रिक्षा सोडून इतरत्र जाणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. अन्यथा एखाद्या गरजूला रिक्षाची गरज भासल्यास रिक्षा आहे परंतु चालक नाही असे घडू नये याची दक्षता घेण्यात यावी असे व्यवस्थापक यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आपण दिलेले निवेदन याचा विचार मंदिर समिती नक्कीच करेल व भाविकांची गैरसोय दूर करण्यात येईल असेही मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापकांनी सांगितले.