स्वेरीत 'डिझाइन, मॅनिफॅक्चरींग अँड टेस्ट ऑफ थ्री फेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफार्मर’ यावर कार्यशाळा संपन्न

0
उद्योग व अर्थव्यवस्थेत इंजिनिअरिंगला अतिशय महत्वाचे स्थान  - ट्रान्सफार्मर कंपनीचे संस्थापक नचिकेत कुलकर्णी

           पंढरपूर– ‘शिक्षणातून जीवन मार्ग निवडताना जे आवडीचं आहे त्याला प्राधान्य द्यावे. ते मिळाले तर उत्तमच, पण जर हुकले तर जे मिळाले आहे त्यावर निर्मळपणे प्रेम करून त्यात स्वत:ला झोकून द्यावे आणि यश निश्चित समजावे. दहावी- बारावी नंतर करिअरचा मार्ग निवडताना इंजिनिअरिंग हा सदा सर्वकाळ अतिशय उत्तम पर्याय राहिल्याचे या अगोदरच स्पष्ट झाले आहे. इतर कोणत्याही शाखेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा पदवी अथवा पदविकाधारक याच्या तुलनेत इंजिनिअर्सना भविष्यात अमर्याद संधी उपलब्ध असतात. त्यामुळे उद्योग व अर्थव्यवस्थेत इंजिनिअरिंगचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.’ असे प्रतिपादन  ट्रान्सफार्मर कंपनीचे संस्थापक नचिकेत कुलकर्णी यांनी केले. 
           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात ‘डिझाइन, मॅन्यूफॅक्चरींग अँड टेस्टींग ऑफ थ्री फेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफार्मर’ या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यात ट्रान्सफार्मर कंपनीचे संस्थापक नचिकेत कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तसेच इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.दिप्ती तंबोळी यांनी कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. ट्रान्सफार्मर कंपनीचे संस्थापक नचिकेत कुलकर्णी हे पुढे म्हणाले की, ‘अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांनी कोअर संदर्भात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नवनवीन उदयोग व्यवसायात नोकरीच्या संधी मिळू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात कठोर मेहनत करणे आवश्यक आहे.’ ट्रेनींग विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे म्हणाले की, 'भविष्यात इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग क्षेत्रात नोकरीच्या खूप संधी असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, रेल्वे, इलेक्ट्रिकल व्हेईकल कारखान्यातही ही रोबोटिक्स, ऑटोमेशन तसेच अनेक प्रशासकीय क्षेत्रात संधी निर्माण होणार आहेत. कोरोना काळात देखील स्वेरीतून प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून कंपन्यामध्ये प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगचे परिपूर्ण ज्ञान अवगत करावे. या शाखेची पाळेमुळे इतर शाखांमध्येही पसरली आहेत. त्यामुळेच या अभियांत्रिकीच्या शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे उच्चारताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक मशिन, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यासारखे शब्द. काळाबरोबर या शाखेची यशस्वी वाटचाल व विकास सुरू आहे.’ असे सांगितले. या पाच दिवसात बेसिक ट्रान्सफार्मर पासून टाईप, रेटींग, मटेरियल रिक्वायर, वायंडिंग डिझाईन, कनेक्शन, बुशिंग, कुलिंग, आदी उच्च दर्जाच्या ट्रान्सफार्मर प्रोटेक्शन पर्यंत सर्व सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्रा.डॉ. मोहन ठाकरे यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन प्रा.रंजना खांडेभराड यांनी केले तर प्रा. सागर कवडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)