श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान २,१०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रा
पंढरपूर (प्रतिनिधी) - भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्रीनामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्रीज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्रीगुरु नानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) अशी सुमारे २,१०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रा निघणार आहे. या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर संत नामदेवमहाराज यांचे १७ वे वंशज ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली नामदास यांच्या हस्ते उमा महाविद्यालय, रेल्वेस्टेशन रोड , पंढरपूर येथे सकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यांच्यासमवेत धर्मप्रसाराचे काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पश्चात नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने गतवर्षी भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनामदेवमहाराज यांची श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान अशी सायकल यात्रा सुरू झाली. त्याला सायकलस्वारांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध राज्यांतील भाविकांची मागणी आणि संत नामदेव महाराजांच्या शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंदाही भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्रीनामदेव दरबार कमिटी (घुमान) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा निघणार आहे. या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी होणार असून, ही यात्रा २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून निघणार असून, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे पोचणार आहे.
पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत
संत नामदेव महाराजांच्या सायकल यात्रेचे नऊ डिसेंबर रोजी चंडीगड येथे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे स्वागत करणार आहेत. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र घुमान येथे १२ डिसेंबर रोजी या सायकल यात्रेचा समारोप होणार आहे. २३ डिसेंबर रोजी रथयात्रा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.