२२ किलोमिटर पायी चालून मराठा आरक्षणसाठी विठुरायाला साकडे
रोपळेतील अंदोलकांची मराठा आरक्षण पायी दिंडी
पंढरपूर (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणाला तिलांजली देवून सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावे. तसेच त्यासाठी या सरकारला सकारात्मक भुमिकेची सुबुध्दी द्यावी. अशा प्रकारचे साकडे पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील सकल मराठा समाजातील आंदोलकांनी २२ किलोमिटरचे अंतर पायी चालुन मराठा आरक्षण दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या विठुराया चरणी घातले.
आज गुरूवारी सकाळी ९.३० वाजता रोपळे येथून या मराठा आरक्षण दिंडीचे प्रस्थान झाले. पंढरपूर -कुर्डूवाडी मार्गावरून निघालेल्या या मराठा आरक्षण दिंडीला भेट देवून पाठींबाही दर्शवीला. बाभुळगाव येथे येथील सकल मराठा समाजाच्यावतीने या आरक्षण दिंडींचे स्वागत केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत शांतता व शिस्तीच्या आंदोलावरती ठाम राहण्याची भुमिका व्यक्त केली.
त्यानंतर आढीव येथेही या आरक्षण दिंडीचे स्वागत करण्यात येवून मराठा आरक्षणसाठी सबंध मराठा समाज एकवटला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हा लढा पुढे सुरूच राहील अशी भुमिका येथील ह. भ. प. शंकर महाराज चव्हाण व सोमनाथ गोरेंसह समाजबांधवांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षण दिंडी पंढरपूर शहरामध्ये दाखल होताच या दिंडीने चंद्रभागा नदीमध्ये जावून मराठा आरक्षण विरोधी भुमिकेचे शुध्दीकरण व्हावे असे साकडे घातले. चद्रभागा वाळवंटामध्ये दिंडीतील आंदोलकांकडून श्री पुंडलिक मंदिरामध्ये दर्शन घेवून आरक्षण दिंडीने विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केले. आराक्षण दिंडी महाव्दार घाटावर पोहचल्यापासून नामदेव पायरीपर्यंत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे विठ्ठल मंदिर परिसर घोषणांनी दणाणून गेला. या आंदोलकांनी नामदेव पायरीचे दर्शन घेवून "बा..विठ्ठला या सरकारला मराठा आरक्षणाची सुबूध्दी दे" असे साकडे घालण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणार्या समाज बांधवांनीही यामध्ये सहभाग नोदंवीत पाठींबा तर दिलाच परंतु घोषणा बाजीतही सहभागी झाले.