तुळशी वृंदावन भाविकांसाठी चालू करावे- ग्राहक पंचायतीची मागणी

0
कार्तिकी यात्रेतरी तुळशी वृंदावन सुरू व्हावे....

           पंढरपूर (प्रतिनिधी) - तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील बंद असलेले तुळशी वृंदावन भाविकांना पाहण्यासाठी लवकरात लवकर खुले करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर यांचेकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत यांनी दिली. 
             तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना पाहण्यासाठी पर्यटनस्थळ म्हणून वन विभागाने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध संताची मंदिरे, श्रीविठ्ठलाला प्रिय असणाऱ्या विविध प्रकारच्या तुळशीची लागवड, इतर फुलझाडे, तसेच संताची भित्तिचित्रे, त्यांच्या कार्याची सविस्तर ओळख, माहिती सर्वांना व्हावी त्याचबरोबर कारंजे, म्युझिक लाईट, त्याच परिसरात असलेला यमाई तलाव अशा प्रकारे भाविकांना आनंद मिळण्यासाठी तेथे प्रयत्न केले आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यातील काही मंदिराची पडझड झाल्याने विकसित केलेले हे तुळशी वृंदावन  मागील सहा महिन्यापासून बंद आहे. याबाबत वन विभागाकडे संपर्क साधला असता, तुळशी वृंदावन केव्हा सुरू होईल याबद्दलची निश्चित माहिती मिळू शकली नाही.फक्त सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचे काम चालू असल्याचे समजले. 
          सध्या कार्तिकीयात्रेसाठी विविध मार्गावरून भाविकांनी पंढरपूरसाठी प्रस्थान केलेले आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. आलेला भाविक दर्शन घेऊन तुळशी वृंदावन पाहण्यासाठी परिवारासह तेथे जात आहे. प्रत्यक्ष त्याठिकाणी गेल्यानंतर तुळशी वृंदावन दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे असा फलक पाहवयास मिळतो. सोबत आलेली लहान मुले, महिला यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
त्यासाठी वन विभागाने तातडीने भाविकांसाठी तुळशी वृंदावन खुले करण्यात यावे. याबद्दलची वृत्तपत्रात प्रसिद्धी देवुन ही माहिती जनतेपर्यंत, भाविकांपर्यत पोहचवावी अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)