पंढरपूर (प्रतिनिधी) – “छत्रपती शिवाजी महाराज हे दैववादी नव्हते म्हणूनच ते स्वराज्याची स्थापना करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण जेंव्हा दैवी अवतार ठरवतो. तेंव्हा त्यांनी केलेले कार्य आणि गाजविलेले शौर्य आपण नाकारत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्थापनाचा खूपच खुबीने वापर केला. म्हणून ते राजे बनू शकले. माँसाहेब जिजाऊ यांचे मार्गदर्शन आणि
शहाजीराजे यांची प्रेरणा यामुळेच त्यांनी ‘स्वराज्य’ निर्मिती केली. शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक हे जिजाऊंच्या संस्कारात दडले आहे. म्हणूनच चारित्र्य संपन्न राजा म्हणून छत्रपती शिवाजींची इतिहासात नोंद आहे.” असे प्रतिपादन थोर मराठी अर्थतज्ज्ञ गिरीश जाखोटिया यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात, प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
‘शिवरायांच्या यशाची दहा सूत्रे’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत
होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
गिरीश जाखोटिया पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना आणि प्रसंग पहिले तर आपण अचंबित होतो. त्यांनी केलेले कार्य आणि दाखविलेले धाडस याच्या मागे त्यांनी केलेले सामाजिक व राजकीय व्यवस्थापन होय. सर्वधर्म समभाव, सहिष्णूता, शुद्ध चारित्र्य, गुणवत्ता, स्वभावातील लवचिकता, वेळ निभावून नेण्याची सचोटी, परिस्थितीनुसार धोरणात बदल करण्याचा मुत्सद्दीपणा, नवनिर्माण, कल्पकता, वक्तशीरपणा, गुणांची पारख, माणसे ओळखण्याची कला, दूरदृष्टी, नियमाप्रमाणे कठोर भूमिका, विवेकवाद या गुणविशेषणाच्या बळावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचाच फक्तइंग्रजांना शेवट पर्यंत धाक होता.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक
प्रबोधिनी समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमास
उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे,
उपप्राचार्य राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ.
अनिल चोपडे, सुपरवायझर युवराज आवताडे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका
भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. एन. के. पाटील यांनी
मानले.