लाह्या व बुक्क्याची उधळण करीत महाद्वारकाला उत्साहात संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीकृष्णाने आपल्या बालसवंगड्यासह काला करून परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये भेद नसल्याचा संदेश दिला होता. यामुळेच काल्याची ही परंपरा वारकरी संप्रदायाने जपली आहे. दरम्यान येथील हरिदास घराण्यात गेल्या दहा पिढ्यापासून काल्याचा उत्सव साजरा केला जातो. हरिदास घराण्यातील संत पांडुरंगमहाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने दर्शन देत आपल्या खडावा प्रसाद म्हणून दिल्याची अख्यायिका आहे. तेव्हां पासून हरिदास व संत नामदेवमहाराज यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.
यावेळी परंपरे प्रमाणे ह. भ. प. नामदासमहाराज यांची दिंडी काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुका ह. भ. प. मदनमहाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर हा सोहळा श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला व पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दही, लाह्याने भरलेली हांडी फोडण्यात आली. यानंतर महाव्दार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माहेश्वरी धर्मशाळेत दहीहांडी फोडून हरिदास वेस मार्गे उत्सव पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.
काल्याच्या उत्सवास हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. भाविक जागोजागी कुंकू, बुक्का व लाह्याची उधळण करीत पादुकांचे दर्शन घेत होते. काल्याच्या वाड्यात हजारो भाविकांना लाह्या, दही, दूध यापासून बनविलेल्या काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. दरम्यान महाद्वारकाल्यानंतर श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे खऱ्या अर्थाने कार्तिकी यात्रेची सांगता झाल्याचे मानण्यात येते.