पंढरपूर, दि. 08 : - कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी असून, यात्रा कालावधी दि.14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. दर्शन रांगेतील वारकरी, भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्शन रांगेजवळील खाजगी मालकीच्या जागेवर तात्पुरते विश्रांतीकक्ष उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मोहोळचे प्रांताधिकारी. अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निंबकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषध उपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता आदी सुविधा देण्यात येणार आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी दर्शन रांगेत ज्या ठिकाणाहून घुसखोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. पत्राशेड जवळील असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी दर्शन रांगेतून सुलभ शौचालयाकडे जाण्यासाठी तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करावी तसेच तेथून घुसखोरी होणार नाही यासाठी सुरक्षा व्यवस्थाही करण्यात यावी. यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटाची स्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे तसेच अतिक्रमणे मोहिम राबवावी, पिण्याच्या पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासावेत. तात्पुरते उभारण्यात आलेल्या शौचालयाची सतत स्वच्छता करावी त्यासाठी अधिकचे कर्मचारी नेमावेत. विष्णुपद बंधाऱ्याजवळ असणाऱ्या सांडपाण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. धोकादयक इमारतींना ठळक फलक लावावेत तसेच त्या ठिकाणी बॅरेकेटींग करावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, सुसज्ज रुग्णवाहिका,मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी . अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने चंद्रभागा बसस्थानकातूनच प्रवाश्यांनी वाहतुक करावी. वारी कालावधीत शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील तसेच गर्दीच्या ठिकाणी कोणातीही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तसेच मंदीर समितीकडून कार्तिक यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर नगरपालिका प्रशासनाकडून यात्रा कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.
तत्पुर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यासाठी दर्शन रांगेच्या शेजारी असलेल्या खाजगी मालकीच्या तसेच संस्थांच्या जागेची पाहणी केली यामध्ये लक्ष्मन पाटील मंदिराच्या पाठीमागील जागा, गॅस गोडाऊन येथील जागा थोरली तालीम येथील असणाऱ्या रिकामी जागा तसेच गोपाळपूर येथील जागेची पाहणी केली. तसेच दर्शन रांगेतील बैठकीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची तसेच आपत्कालीन मार्गाची पाहणी केली.