स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यशाळा संपन्न

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने दि. ०५ ऑक्टोबर  ते ०९ ऑक्टोबर २०२३ या  दरम्यान 'अॅडवान्सड इंडस्ट्रिअल ऑटोमेशन अँड कंट्रोल' या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
      विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांच्या वाढीसाठी व तंत्रज्ञान विषयक ज्ञान अद्ययावत होण्यासाठी  स्वेरी सातत्याने विविध  विद्यार्थीपूरक उपक्रमांचे आयोजन करत असते.  अशा उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, स्वेरीच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या सहकार्याने व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेत तृतीय वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे उदघाटन मंगरूळच्या इंडवेल ऑटोमेशनचे संस्थापक-ट्रेनर हिमांशु कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने बहुमोल असे मार्गदर्शन केले.
           दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील  नोकरीच्या संधी बाबत  मार्गदर्शन केले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. सचिन खोमणे यांनी या कार्यशाळेचे येणाऱ्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. सलग पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयासंदर्भातील तांत्रिक व  मुलभुत तंत्रज्ञान ते आधुनिक तंत्रज्ञान यांचा  प्रात्यक्षिकाद्वारे अनुभव करून देण्यात आला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पीएलसीची मुलभूत ओळख करून देण्यात आली तसेच विविध औद्योगिक तंत्रज्ञानाचा उपयोग यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले गेले तसेच प्रात्यक्षिक व पीएलसी मध्ये वापरणाऱ्या विविध इनपुट उपकरणांची व त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची ओळख करून दिली गेली. तिसऱ्या दिवशी ‘एससीएडीए’ या विषयावर ‘मुलभुत प्रात्यक्षिके व त्यांचे  औद्योगिक क्षेत्रात होणारे उपयोग’ यावर मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी एसी मोटर वापरून छोटे प्रयोग करून दाखविले. पाचव्या दिवशी ‘एचएमआय चे उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोडेसेस सॉफ्टवेअरची मुलभूत ओळख करून देण्यात आली. त्याचबरोबर जी-एक्स  सॉफ्टवेअरची देखील ओळख करून देऊन त्याद्वारे लहान प्रकल्प तयार करण्यात आले. त्या अनुषंगाने  एचएमआय व एमएमआयचा वापर करून विविध प्रकल्प तयार करण्यात आले. शेवटच्या  दिवशी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची झालेल्या कार्यशाळेच्या संदर्भात परीक्षा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कोअर क्षेत्रातील नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी कंपनीचे ट्रेनर हिमांशुकुमार यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले तसेच स्वेरीमध्ये होत असलेल्या  विविध विद्यार्थीपूरक उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यशाळेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
          या कार्यशाळेसाठी प्रा.विजय सावंत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. श्रेया मोहोळकर यांनी केले तर प्रा. धनराज डफळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)