कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - “ब्रिटिश वसाहतवादी कालखंडातील साहित्याचा आपल्या साहित्यावरती प्रभाव असून या  मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे. तरच आपली मूळची संस्कृती, भाषा व ओळख यातून आपणास आपले साहित्य पुढे आणता येईल. मानवता व स्री-पुरुष समानता हे विचार जागतिक साहित्यातून पुढे आले पाहिजे” असे प्रतिपादन यूनिवर्सिटी ऑफ केलानिया श्रीलंका येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शशिकला अस्सेला यांनी केले. 
           रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत  इंग्रजी विभाग व सोलापूर इंग्लिश टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड लिटरेचर्स अँड कल्चरल स्टडीज’ या विषयावरती एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विद्यापीठ धारवाड, कर्नाटक येथील इंग्रजी विभागाचे प्रोफेसर प्रा. बसवराज दोनुर हे होते. या परिषदेत त्रिभुवन युनिव्हर्सिटी, काठमांडू नेपाळ येथील लिटररी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रो. डॉ. खूम प्रसाद शर्मा यांनी बीजभाषण केले. 
          प्रोफेसर डॉ. शशिकला अस्सेला पुढे म्हणाल्या की, “जागतिक साहित्य समृद्ध करण्यामध्ये दक्षिण आशियाई लेखकांचे मोलाचे योगदान असून त्यांनी आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व साहित्याच्या माध्यमातून जगाला पटवून दिले.” 
             अध्यक्षीय भाषणात प्रोफेसर प्रा. बसवराज दोनुर म्हणाले की, “ प्रादेशिक साहित्य व संत साहित्य यांचे जागतिक साहित्यात महत्त्वाचे स्थान असून ते समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळे साहित्य, समाज व संस्कृती यांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.”  
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व शाल देवून स्वागत केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख तथा परिषदेचे निमंत्रक प्रा. डॉ. समाधान माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समन्वयक प्रा. डॉ. धनंजय साठे यांनी करून दिला. 
परिषदेच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रामध्ये अनुक्रमे डॉ. शशिकला अस्सेला श्रीलंका व  डॉ. जय सिंग, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद यांनी तज्ञ व्याख्याते म्हणून व्याख्यान दिले. तर या दोन्ही सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शरद गाडेकर व प्रा. डॉ. विष्णू पाटील हे होते. चौथ्या सत्रामध्ये देशभरातून अनेक प्राध्यापक व संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे ‘जागतिक साहित्य व सांस्कृतिक अभ्यास’ या विषयावरती ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने सादरीकरण केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे सोलापूर इंग्लिश टीचर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कदम व सेक्रेटरी प्रा. डॉ. सचिन लोंढे हे होते.  या परिषदेत ‘पद्मकन्या मल्टिपल कॅम्पस, त्रिभुवन युनिव्हर्सिटी काठमांडू, नेपाळ’ व इंग्रजी विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. 
         ही परिषद यशस्वी करण्यासाठी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रा. धनंजय वाघदरे, रुसा समिती समन्वयक प्रा. योगेश पाठक, प्रा. डॉ. चंद्रकांत काळे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, प्रा. सुहास शिंदे, प्रा. कुबेर गायकवाड, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. प्रवीण शिंदे पाटील, प्रा. सैफअली विजापुरे, प्रा. श्रीधर रेवजे, प्रा. राजेंद्र मोरे, अभिजित जाधव, सुरेश मोहिते, आदी शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)