पंढरपूर (प्रतिनिधी) - जवळपास दोन शतकाहून अधिक काळापासून नाथषष्ठी उत्सवाची परंपरा-जतन करुन वृध्दींगत करीत भारतासह पाश्चात्य देशामध्ये पोहोंचवणाऱ्या औश्याच्या श्री. नाथ संस्थानच्या अद्वैत धर्मपिठास महाभागवत पुरस्कार' सरसंघचालक डॉ. श्री. मोहनजी भागवत यांचे हस्ते नाथांच्या पैठणक्षेत्री दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आला.
श्रीसंत एकनाथांच्या दरबारी पैठण इथे श्री. नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री. गुरुबाबा महाराज औसेकर व पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदीर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष तथा नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरु श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर या बंधुद्वयांचा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
औश्याचे श्री. नाथषष्ठी उत्सवाची मोठी जुनी परंपरा आहे. नाथसंस्थानचे मुळ सत्पुरुष सद्गुरु श्री. वीरनाथ महाराज यांना -
“दत्तात्रय आज्ञा जनार्धनासी |
जनार्धन आज्ञा नाथासी |
गुंडा आज्ञा वीरासी |
नाथषष्ठी कराया ||"
या वचनाप्रमाणे सद्गुरु गुरु गुंडा महाराजांचेकडून शके १७१८ मध्ये उत्सव प्रसाद प्राप्त झाला, तेंव्हापासून सलग २२७ वर्ष अखंडपणे प्रतिवर्षी नाथसंस्थान हा नाथषष्ठीचा उत्सव साजरा करते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात (द्वारका), तामिळनाडू (रामेश्वर), उत्तरप्रदेश (वाराणसी-काशी) इथे सद्गुरु परंपरेची, सद्गुरु मल्लनाथ महाराज, सद्गुरु दासवीरनाथ महाराज, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांनी नाथषष्ठी उत्सव केला, आता हीच परंपरा नंतर सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि सद्गुरु श्री. गहिनीनाथ महाराज यांनी अत्यंत श्रृध्देने परिश्रमपुर्वक जपली वाढवली आहे. नाथांची जवळपास १६० मंदीरे नाथसंस्थाननी उभारली आहेत. नाथषष्ठी उत्सवात नाथांची स्थापना, पुजन, नामसंकिर्तन, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवतांची पारायणे, संस्थानची साधना असणारे, प्रासादिक चक्रीभजन, प्रवचन, किर्तनातून नाम- गुरुसेवा, नाथांची शिकवण, संस्कार रुजवण्याचे अव्याहतपणे कार्य सुरु आहे.
नाथसंस्थानच्या या भक्तीयोगदानाची दखल शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथकौस्तुभ श्री. एकनाथी भागवत जयंती चतुःशतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त श्री. संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी व श्री.संत एकनाथ महाराज शिष्य परिवार पैठणकर फडाच्या वतीने सरसंघचालक डॉ.श्री. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते नाथ संस्थानच्या औसेकर महाराजांना 'महाभागवत पुरस्काराने' सन्मानीत करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक अध्यात्मिक सोहळ्यास केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे, श्री. डॉ. भागवत कराड, छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री श्री. संदिपान भुमरे, महामंडळेश्वर शांतीगीरी महाराज, राजेंद्र महाराज ये प्रे. श्रीराम महाराज झिंझुरके, सरदार महाराज गोसावी, मा.आमदार श्री. हरिभाऊ बागडे यांचेसह किर्तनकार, प्रवचनकार, नाथभक्त, वारकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.