उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाआरोग्य शिबिराला भेट

0
सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊ - डॉ. सावंत 

          पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्यावतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरीता आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            ६५ एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबाराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.
आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

        श्री. फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरीता ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. १४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करीत आहोत. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत राज्यातील दोन ते अडीच लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांना आजार होऊच नये याकरीता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सामान्य नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार

        प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांवर ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करुन, कुठलीही अट न ठेवता राज्यातील नागरिकांनाही ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागाच्यावतीने 'आरोग्याचा अधिकार' (राईट टू हेल्थ) कायदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक होईल.
महाआरोग्य शिबाराचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ

              आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतात. त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा धाडशी निर्णय घेतला. सदरचे महाशिबीर पार पडल्यानंतर एक 'महारेकॉर्ड' तयार झाला. त्यामध्ये सुमारे ११ लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करुन घेतले. ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते, त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबारात आजपर्यंत सुमारे ४२ हजार रुग्णांनी लाभ घेतला. गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 
कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीराचे लाभ घेण्याचे  सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

         आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिशय कमी कालावधीत महाआरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.  आषाढी एकादशी यात्रेनिमित आयोजित महाआरोग्य शिबीरात ११ लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात  मोफत करण्यात येत आहेत. 
या महाशिबिरात अतिदक्षता विभाग, आपला दवाखाना तीनची निर्मिती, परिसरात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६० सुसज्ज रुगणवाहिका, २ हजार ९०० कर्मचारी, रुग्णाचे नियोजन करण्यासाठी वार रुम कार्यान्वित करण्यात आली आहे.  वारकऱ्यांना महाआरोग्य शिबाराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी २२, २३ व २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मोफत उपचार संकल्पनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांनी बाह्य  व अंर्तरुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे. 

           देशाचे प्रधानमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन  डॉलरवर नेण्याकरीता राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ असले पाहिजे. त्यादृष्टीने येत्या अधिवेशनात 'राईट टू हेल्थ' विधेयक मांडण्याच्या मानस केला आहे. येत्या काळात राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊ, असा संकल्प डॉ. सावंत यांनी केला. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)