सर्व मालमत्ता धारकांना अंतिम मुदत ३१ डिसेंबर अखेर वाढविण्यात यावी
पंढरपूर (प्रतिनिधी) - सुधारित कर आकारणीस म्हणणे देण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकार्ऱ्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या नवीन कर निर्धारणाच्या (२०२३-२४ ते २०२७-२८) नोटीसा वाटप करण्याचे काम सध्या चालू आहे. त्या नोटीसीस उत्तर देण्यासाठी १२ डिसेंबर २०२३ ही मुदत देण्यात आलेली आहे. अद्यापही नोटीस बजावण्याचे काम चालू आहे. देण्यात आलेल्या नोटीसीमध्ये जाहीर प्रसिद्धीकरण केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्यावे असे सूचित करण्यात आलेले आहे.तसेच आकारणीची पध्दत, घेतलेले मोजमाप याची माहिती घेण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात समक्ष यावे असेही सुचित केले आहे.
वास्तविक पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वर्षभरात आषाढी, कार्तिकी या दोन मोठ्या यात्रा भरतात, त्यावरच येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीमध्ये पंढरपूर परिसरातील मालमत्ता धारक, नागरीक हे या यात्रेच्या पूर्वतयारीमध्ये गुंतलेले असतात.यात्रेच्या कालावधीत नगरपालिकेमध्ये समक्ष येणे शक्य नाही. याची माहिती या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना असते.
विषेशतः नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. तरीही ही सूचना १३ नोव्हेंबर या दिवशी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली व १२ डिसेंबर पर्यंत आक्षेप किंवा तक्रारी नोंदविण्यात याव्यात असे सूचित करण्यात आले. १३ नोव्हेंबर ही तारीख ऐन दिवाळीमध्ये (११ ते१५ दिपावली) आहे. त्यानंतर या परिसरातील करदाते मालमत्ताधारक, नागरिक, अधिकारीही कार्तिकी यात्रेच्या पूर्वतयारीत गुंतलेले असतात व या यात्रेचा कालावधी साधारणपणे पंचमी ते वद्य प्रतिपदा (म्हणजेच १७- २८ नोव्हेंबर) महाद्वारकाला आणि त्यानंतर होणारी प्रक्षाळपूजा इथपर्यंत असतो. यावेळची प्रक्षाळपूजा एक डिसेंबर रोजी आहे. म्हणजेच नोटीस प्रसिद्धीकरण करण्याची तारीख १३ नोव्हेंबर दिवाळीमध्ये आणि आक्षेप घेण्याची मुदत १२ डिसेंबरपर्यंत म्हणजे शहरातील नागरिकांना व करदात्यांना केवळ बारा दिवसांचा कालावधी या नोटिशीस उत्तर देण्यासाठी उपलब्ध होत आहे. म्हणजेच याकरिता त्यांना पुरेसा कालावधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक दिवाळीचा कालावधी व त्यानंतर होणारी कार्तिकी यात्रा हा कालावधी वगळून नंतरही किंवा दिवाळीपूर्वी एक महिना सूचना प्रसिद्ध करता आली असती व येथील करदात्यांना कायदेशीररित्या आक्षेप घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत उपलब्ध करून देता आली असती म्हणजेच येथील नागरिकांना आक्षेप/ तक्रारी नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये ही बाब नगरपालिकेने विचारात घेतली की काय अशी शंका येते. त्यामुळे प्रथमतः सर्व मालमत्ता धारकांना ज्या पद्धतीने कर आकारणीची बिले दिली जातात त्याच पद्धतीने प्रत्येक मालमत्ता धारकांना बिल मिळाले पासून ३० दिवसाची मुदत मिळाली पाहिजे. त्यासाठी विनंती की, १२ डिसेंबर ही दिलेली अंतिम मुदत ३१डिसेंबर अखेर वाढविण्यात यावी, जेणेकरून करमुल्य निर्धारणाबद्दलची सविस्तर माहिती मालमत्ता धारकांना घेता येईल. तसेच यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये नगरपालिकेमार्फत शिबिरे घेऊन, बैठका घेऊन या आकारणीबाबत सविस्तर माहिती दिली पाहिजे. प्रत्येक करदात्याला निर्धारणाबद्दलची माहिती घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.त्यामुळे प्रथमतः याची मुदत वाढीचे प्रसिद्धीकरण करण्यात यावे. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांच्या/ मालमत्ता धारकांच्या बैठका घेण्याचे नियोजन प्रसिद्ध करून त्यांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात यावे. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे.आणि नंतरच सुधारित कराची आकारणी अंतिम करण्यात यावी अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख,
जिल्हा सचिव सुहास निकते, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, संघटक महेश भोसले, सचिव धनंजय पंधे, सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर संतोष उपाध्ये यांनी केली आहे.