शिर्डी जि. अ. नगर (प्रतिनिधी) - शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या साईबाबा शिर्डी पंचक्रोशीतील दिंडीला कंटेनर घुसल्याने नाशिक-पुणे महामार्गावर ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून मनाला अतिव वेदना देणारी आहे . घटनेची माहिती मिळता क्षणी संगमनेर येथे पोहोचत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधला. या घटनेमधील ९ अपघातग्रस्तांची संगमनेर येथील कुटे हॉस्पिटल येथे भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी श्री.सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.) यांना निर्देश देत वारकऱ्यांची पूर्णतः काळजी घेण्यासाठी तत्पर राहण्यास सांगितले आहे. सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल होईपर्यंत जिल्हाधिकारी सालीमठ रुग्णालयात उपस्थित होते. डॉ. प्रदीप कुटे व त्यांचे सहकारी सर्वतोपरी उत्तम उपचार करत आहेत.
मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंगेशजी चिवटे हे देखील पूर्ण वेळ संपर्कात आहेत. संबंधित यंत्रणेला त्यांनी देखील आवश्यक ते निर्देश दिले आहेत. यावेळी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले समवेत किशोरमहाराज धुमाळ, सुनीलमहाराज मंगळापूरकर , नारायणमहाराज काळे, श्रीराममहाराज माळी व उदयमहाराज आडवळे उपस्थित होते.
शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार तर आठ वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.०३) दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावर १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात घडला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताराबाई गंगाधर गमे (वय ५२, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (वय ५०, रा. कनकुरी, ता. राहाता), बबन पाटीलबा थोरे (वय ६५, रा. द्वारकानगर, शिर्डी, ता. राहाता), बाळासाहेब अर्जुन गवळी ( वय ५०, रा. मढी, ता. कोपरगाव) अशी अपघातातील मयतांची तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय ५५, रा. वाकडी, ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय ५५, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय ६९, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय १७, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय ७५, रा. पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक), शरद सचिन चापके (वय १७, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय ३५, रा. ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), मीराबाई मारुती ढमाळे (वय ६०, रा. दुशिंगवाडी, वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत.