मार्गशीर्ष मासात श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर;
वन भोजनाला विशेष महत्त्व;
पंढरपूर (प्रतिनिधी) :- प्रतिवर्षी प्रमाणे मार्गर्शीर्ष शुध्द 1 दि.13/12/2023 ते मार्गशीर्ष वद्य 30 दि.11/01/2024 या कालावधीत विष्णूपद उत्सव संपन्न होत आहे. या उत्सवास अनन्य साधारण महत्व असून श्री.विष्णूपद मंदिर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सदर ठिकाणी वनभोजनाची प्रथा असून, या ठिकाणी मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीने सन 2015 मध्ये पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे ताब्यात घेऊन, त्यांचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामध्ये गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिराचा समावेश आहे. या मंदिराच्या ठिकाणी उत्सवानिमित्त दर्शनरांगेसाठी बॅरीकेटींग, स्वच्छतेसाठी कर्मचा-यांची नियुक्ती, अभिषेक करण्याची सोय, सुरक्षतेच्या दृष्टीने कमांडोजची नियुक्ती करण्यात आली असून, मंदिर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
त्या अनुषंगाने आज श्री. विष्णुपद मंदिरास भेट देऊन पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख श्री अतुल बक्षी उपस्थित होते.
चंद्रभागेच्या तीरावर निसर्गरम्य अशा पंढरपुरपासून दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. चंद्रभागा तीरावरील या मंदिराला बहुसंख्य पर्यटक हे नदीमार्गे होडीतून येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. याठिकाणी देव गोपालक आणि आपल्या गाईंसमवेत येऊन क्रीडा करीत असल्याच्या आख्यायिका असून येथील दगडावर अनेक ठिकाणी गाईच्या आणि गोपालकांच्या पायाच्या आकाराच्या खुणा दगडात तयार झालेल्या आहेत. मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी आणि गोपाळकाल्याच्या भांड्याच्या खुणा दगडात दिसतात.
मार्गर्शीर्ष शुध्द 1 ते मार्गशीर्ष वद्य 30 अखेर श्री.विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर असते अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णूपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. मार्गशीर्ष वद्य 30 या दिवशी श्री.विठ्ठलाची सवाद्य रथ मिरवणूक काढून प्रदक्षिणा मार्गाने रथ नामदेव पायरीजवळ येतो अशी परंपरा असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी दिली.