पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सोलापूर जिल्ह्यातर्फे २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण, प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात हा प्रबोधन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
देशभरामध्ये २४ डिसेंबर हा दिवस "राष्ट्रीय ग्राहक दिन" म्हणून शासकीय, अशासकीय पातळीवर साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने दिनांक १५ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध कार्यक्रम,उपक्रम,स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील कार्यालये, पंचायत समिती, शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, महावितरण,ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये,वजन मापे (वैधमापन), अन्न व औषध प्रशासन (भेसळ प्रतिबंधक), नगरपालिका, महानगरपालिका, टपाल कार्यालये, बस स्थानके,रेल्वे स्टेशन, राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बँका,पतसंस्था,पोलिस विभाग,कोषागार कार्यालय, आर.टी.ओ कार्यालये,तसेच व्यापारी कमेटी, कृषी उत्पन्न बाजार समिती,अशा विविध शासकीय, अशासकीय कार्यालये,सार्वजनिक ठिकाणी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बाबत व ग्राहक चळवळीची माहिती दिली जाणार आहे. यासाठी प्रांत उपाध्यक्ष भालचंद्र पाठक, कोषाध्यक्ष विनोद भरते, प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, कोषाध्यक्ष सचिन साखरे, जिल्हा सहसंघटक डॉ.सौ मैत्रेयी केसकर,जिल्हा महिला विभाग प्रमुख सौ माधुरीताई परदेशी,प्रबोधन प्रमुख डॉ.प्रशांत ठाकरे,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, संतोष उपाध्ये,तसेच संबंधित खात्याचे अधिकारी व प्रत्येक तालुका अध्यक्ष, संघटक हे उपस्थित राहून प्रबोधन करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमास ग्राहकांनी आवर्जून उपस्थित राहुन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.