'महाराष्ट्रातील जनतेची हजारो कोटींची लुबाडणूक'

0
"सायबर क्राईम सेल सक्षम करा !"  

अॅड. मनीश गडदे पाटील यांची गृहमंत्री फडणवीस यांचेकडे मागणी.

         सोलापूर दि. 29 डिसेंबर:-
सायबर क्राईम द्वारे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे हजारो कोटी रुपये गेल्या वर्षभरात लुबाडले गेले आहेत, लाखो बेरोजगार युवा तरुण खोट्या आमिषाला बळी पडून या दृष्टचक्रात अडकून बरबाद झाले आहेत, सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या व्यवस्थेपेक्षा अधिक अद्यावत आहेत की काय? अशी शंका येते आहे, आणि म्हणूनचं महाराष्ट्राचा सायबर क्राईम विभाग अधिक अद्यावत, आधुनिक व सक्षम करण्यात यावा अशी मागणी  महाराष्ट्र काँग्रेसचे सेक्रेटरी अॅड. मनीश गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
          सदर निवेदनात विषय मांडताना,
महाराष्ट्रात सन 2023 सालामध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून दर तासाला १००गुन्हे घडत आहेत. याद्वारे गोरगरीब, कष्टकरी, कामगार जनतेचे हजारों कोटी रुपये गुन्हेगारांनी लुबाडले आहेत. यामुळे लाखो नागरिक आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होऊन बरबाद झाले आहेत व त्यांचे घरसंसार देशोधडीला लागले आहेत.

          सोलापुरात मेगाफंड, चिटफंड, क्राउडफंड यानावे बोगस कंपन्यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये बहुतांश बाधित हे बेरोजगार तरूण व विद्यार्थी असून या तरुण पिढीने घरातून पैसे चोरून, दागिने विकून, मोबाईल/गाडी गहाण ठेवून पैसे गुंतवले व खोट्या अमिषाला बळी पडून लुबाडले गेले आहेत. विशेष म्हणजे या तरुणांना नेमकं कुणी फसवलंय हेसुद्धा माहित नाही इतकी विदारक अवस्था आहे.

         चोरी, खंडणी, दरोडा, खून करणे याऐवजी अधिक सोप्यामार्गाने जलदगतीने तंत्रज्ञानाच्या आधारे ओटीपी मागून,बँक केवायसी, वीजबंद, कर्जमंजुरी, विमाहप्ता, बक्षीस लागले, मोबाईल/डीटीएच रिचार्ज अशी एक ना अनेक वेगवेगळी खोटी कारणे सांगून  जनतेला रोजचं लुबाडत आहेत.पण 'दाद ना फिर्याद' अशी स्थिती आहे.

          राज्यात सायबर गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे, खरंतर पुरोगामी, विज्ञानवादी, समाज सुधारकांच्या महाराष्ट्रात दिवसाढवळ्या निष्पाप लोकांच्या लुबाडणुकीचे थैमान रोकणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही माजवलेली लूट राज्याच्या लोककल्याणकारी प्रतिमेला काळीमा फासणारी आहे.

       महोदय, महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपण जनतेच्या लुबाडणुकीची गांभीर्याने नोंद घ्यावी व सायबर क्राईम विभाग अत्यंत अद्यावत, आधुनिक व सक्षम करून या सायबर गुन्हेगारीला आळा घालावा, गुन्हेगारी टोळ्या उध्वस्त करून हरामखोरांना जेरबंद करावे आणि राज्यातील जनतेला सुरक्षेचा दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सेक्रेटरी अॅड. मनीश गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)