प्रतिवर्षीप्रमाणे नाताळ सुट्ट्या, मार्गशीर्ष मास व शिवपूराण कथा – रस महोत्सवामुळे लाखो भाविक येण्याचा अंदाज;
श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात दोन वेळ पोटभर भोजन प्रसादाची व्यवस्था.
दर्शन रांगेत चहा व खिचडी वाटप
पंढरपूर (ता.23) :- ख्रिसमस / नाताळ उत्सव दि.20/12/2023 ते दि.01/01/2024 या कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने, दर्शनरांगेत पत्राशेड पर्यंत बॅरीकेटींग करून कायमस्वरूपी पत्राशेड येथे 4 जादा पत्राशेडची निर्मिती करण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
तसेच याच कालावधीत पंढरपूर शहरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवपूराण कथा व पंडित राधाकृष्ण महाराज यांचा रस महोत्सव व मार्गशीर्ष मास सुरू असल्याने श्रींच्या दर्शनरांगेत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जास्तीतजास्त भाविकांना दर्शन मिळावे ह्या उद्देशाने तुळशी पुजेची व पाद्यपुजेची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच सकाळी 6.00 ते रात्री 12.00 या वेळेत श्रींचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्शनरांग द्रुतगतीने व जलद चालविण्यासाठी कमांडोजची नियुक्ती, संपूर्ण दर्शन रांगेवर ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, पायाला खडे टोचू नये म्हणून म्याटींग, पिण्यास मोफत मिनरल वॉटर व चहा, पोलीस विभागामार्फत पोलिस बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्थापन, हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन, सूचना फलक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य सुविधा उपलब्ध असणार आहे.
राज्यात कोरोनाच्या (Covid 19) ‘JN1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं तसेच कोविडशी संबंधित सर्व नियमांचं योग्य रितीने पालन करावे असे शासनाने आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी देखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दुपारी 12.00 ते 2.00 व रात्री 7.00 ते 9.00 या वेळेत पोटभर भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच दर्शन रांगेत तांदळाची / साबुदाण्याची खिचडी मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज शनिवार, दिनांक 23 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सह अध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व सन्माननीय सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), श्री.संभाजी शिंदे तसेच कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत सारडा भवन येथे करण्यात आला. या खिचडी वाटपाची जबाबदारी विभाग प्रमुख श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना देण्यात आली आहे. भाविकांचा विठुरायाच्या ओढीने दर्शन रांगेत होणारा प्रवास अन् थकवा चहा अन् खिचडीमुळे विरला जाण्याचा प्रयत्न होणार आहे. याबाबत दर्शनरांगेतील वारकरी भाविकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.
याशिवाय, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेकामी सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच मंदिर, श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री.संत तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.
तसेच मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 1000 अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.