पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवी व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदविका या दोन महाविद्यालयांचा बेंगलोर येथे मुख्यालय असलेल्या ‘इन्फोसिस लिमिटेड’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे इन्फोसिस कंपनीची स्वेरीच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
या कराराच्या माध्यमातून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा त्याचबरोबर स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ‘इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड’ या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध प्रकारचे फायदे होणार आहेत. प्रामुख्याने यामध्ये करिअरच्या तयारीसाठी सर्वांगीण विकास, भविष्यातील नवीन ट्रेंड्स बद्दल माहिती आणि प्रशिक्षण, या व्यतिरिक्त संस्थेच्या शिक्षकांना देखील कौशल्य विकासासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. या सामंजस्य करारावर ‘इन्फोसिस लिमिटेड’चे वरिष्ठ उपाध्यक्ष व एज्युकेशन ट्रेनिंग अँड असेसमेंट विभागाचे प्रमुख तिरुमला व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिप्लोमा तर्फे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. स्वेरीचे अशाच प्रकारे इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्था, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. या करारांचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट, विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच प्रशासकीय नोकऱ्या व संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी डॉ. विद्याराणी क्षीरसागर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी इन्फोसिसचे वरिष्ठ अधिकारी संतोष अनंतपुरा, ‘सोबस इन्साईटस् फोरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, लोटस इंग्लिस स्कूलच्या डॉ. जयश्री चव्हाण यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.