एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात
तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती व नैतिकता....
पुणे दि. २६ (प्रतिनिधी) - "देशाचा जबाबदार आणि नितिमूल्याधारित नागरिक बनविणे, विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडविणे तसेच विद्यार्थ्याच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर देण्याचा मुख्य उद्देश्य ठेवून ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’ (एमआयटी-व्हीपीयू) ची स्थापना करण्यात आली आहे.” असे मत उपस्थित शिक्षण तज्ज्ञांनी मांडले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’ ( एमआयटी-व्हीपीयू) च्या प्रथम नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. या वेळी नागपूर येथील आयआयएमचे संचालक प्रा.भीमराया मैत्री, संकल्प सेमीकंडक्टरचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष विवेक पवार, प्रिसिजन कॅमशफ्टस लि. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा उपस्थित होते.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. तसेच बंगलोर येथील आयआयआयटीचे माजी संचालक प्रा.एस.सदगोपन हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच एमआयटी एडीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, कुलगुरू प्रा.डॉ. गोपालकृष्ण जोशी व कुलसचिव डॉ. प्रणेश मुरणाल उपस्थित होते.
प्रा.भीमराया मैत्री म्हणाले, "तंत्रज्ञान, संशोधन, सामजिक नवननिर्मिती, भागीदारी व विश्वशांती या तत्वाच्या आधारावर व्हीपीयू ची स्थापना झाली. देशाचा जबाबदार व नितिमूल्याधारित नागरिक बनविण्यासाठी योगदान सर्वात महत्वाचे असेल. येथे विद्येचे उच्च कोटीचे शिक्षण देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, "शिक्षण हे आपल्या भविष्यासाठी आहे. त्यात देह आणि बुध्दीचा विचार आहे. दुसर्या बाजूला आत्मा आणि मन आहे. म्हणजेच कॉन्शसनेस वर शिक्षणात कार्य करावे लागेल. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ज्ञानाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाकडून होत आहे. जगात सध्याची शिक्षण व्यवस्था आहे ती प्रगतीची परिसीमा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, अॅप वगैरे शब्द आता आले. पण याचे चिंतन ज्ञानेश्वरांनी ७३० वर्षापूर्वी केले आहे.”
प्रा.एस.सदगोपन म्हणाले," भारतातील एक सर्वोत्तम शिक्षणाचे मॉडेल एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या माध्यमातून जगासमोर ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात भारताने नवीन दरवाजे उघडले. या क्षेत्राला नवीन दिशा आणि विश्वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्याचा पाया ठेवण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर दिला जाईल.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, "या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संस्था एकत्रितपणे काम करून विविधि प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत. इंटर्नशिप, प्लेसमेंट, लाइव्ह प्रोजेक्ट, गेस्ट लेक्चर्स, अभ्यासक्रम, इंडस्ट्री व्हिजीट, टेक फेस्ट सेंटर अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी व एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातील प्राध्यापकांना उद्योगामधील कामकाज, त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांची गरज लक्षात घेता प्रशिक्षण दिले जाईल.”
प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन रोबोटिक निर्मिती केली जाणार नाही. तर एक चांगला मानव बनविला जाईल. त्यांना शिक्षणाबरोबरच मानवतेचे शिक्षण, अध्यात्म, नीतिमूल्य, शिस्त, चारित्र्य, जगात शांतता कशी निर्माण करता येईल यासाठी पीस सेंटर व मेडिटेशन शिकविले जाईल. सुसंस्कृत समाजनिर्मितीचा ध्यास असून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण देण्यात येईल.”
भारतीय शिक्षण वसुधैव कुटुंबकम्, एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति अशा तत्त्वज्ञानाचे प्रतिक आहे. आताच्या शिक्षणात बदल करून त्याला मूल्यांचे अधिष्ठान असावे, तरच ते खरे शिक्षण ठरेल असे विचार यतीन शहा, प्रा.डॉ. गोपाळकृष्ण जोशी व डॉ. प्रणेश मुरणाल यांनी मांडले.