भाविकांनी व नागरिकांनी आवश्यकती दक्षता घ्यावी -प्रांताधिकारी गजानन गुरव
पंढरपूर दि.22:- राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. पंढरपूरात श्री. विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविक येतात.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून, पंढरपूर शहरात दि.25 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत श्री शिव महापुराण कथा व श्री राम कथा सोहळा कार्यक्रमानिमित्त तसेच नाताळ सणानिमित्त सुट्टी असल्याने श्री. विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, भाविकांनी व नागरिकांनी आवश्यकती दक्षता घेवून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
पंढरपूर शहरात आयोजीत कार्यक्रमाच्या ठिकाणची तसेच शहरातील विविध ठिकाणी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, महावितरणचे श्री. भोळे, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, आरोग्य निरिक्षक शदर वाघमारे उपस्थित होते.
श्री शिव महापुराण कथा व श्री राम कथा सोहळा निमित्त येणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून जेएन-वन या कोरोनाचा नवा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. येणाऱ्या भाविकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे. मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता ठेवावी. स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याचे वेळोवळी तपासणी करण्यात यावी. स्वच्छता गृहाची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवावी,अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्य पदार्थाची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे, सुरक्षित विद्युत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यांनी केल्या.
आरोग्य विभागाने औषधसाठा, ऑक्सिजन पुरवठा, तपासणी लॅब, रुग्णवाहिका कार्यान्वित ठेवावी ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी.गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.
कार्यक्रम सोहळ्याच्या ठिकाणी आयोजकांनी भाविकांना सुरक्षेला प्राधान्य देवून आवश्यक नियोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रखर प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किग व्यवस्था तसेच भाविकांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्थेबरोबरच स्वयंसेवकांची नेमणूक करावी. जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार याची दक्षता घ्यावी अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी दिल्या.
पंढरपूरात श्री. विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविक येतात. राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. मंदीर समितीकडूनही भाविकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
यावेळी आयोजकांकडून भाविकांची सुरक्षा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालयाची उपलब्धता, पार्किग, शुध्द पिण्याचे पाणी, वाहतुक व्यवस्था आदी बाबतचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.