पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार, दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘राष्ट्रसेवादल भवन, पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे’ या ठिकाणी स्वेरी अभियांत्रिकीच्या व व्यवस्थापन (एमबीए) या अभ्यासक्रमांच्या माजी विद्यार्थ्यांकरिता ‘ऋणानुबंध २०२३-२४’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वेरीतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.
अभियांत्रिकी व एमबीए चे शिक्षण झाल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये व नोकरीसाठी अनेक माजी विद्यार्थी पुण्यात स्थायिक होतात. त्यांना या मेळाव्यात सहभागी होता यावे या दृष्टिकोनातून या मेळाव्याचे आयोजन पुण्यात केले गेले आहे. ‘राष्ट्रसेवादल भवन, पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे' या ठिकाणी होणाऱ्या या ‘ऋणानुबंध २०२३-२४’ या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मनमुराद चर्चा, आपआपसात सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण-घेवाण होणार असून आपण काम करत असलेल्या कंपनीत अथवा नोकरीत येत असलेले अनुभव यांचीही देवाण घेवाण होणार आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके व सचिव प्रा. अविनाश मोटे यांनी ‘स्वेरी अभियांत्रिकी व एमबीएच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.’ असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिडॅकचे जेष्ठ संचालक व इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ वसंत अवघडे हे उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे, तसेच गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावाही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पदवी अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून ते गतवर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वेरीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर तसेच भारतातील अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थायीक झालेले माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एकूणच ‘ऋणानुबंध २०२३-२४’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वेरीतील जुना चिवचिवाट पुण्यात नव्याने घुमणार आहे हे मात्र नक्की! माजी विद्यार्थी मेळाव्यासंबंधी अधिक माहीतीसाठी ९९२३४०३७०८, ९८८१७७६१९६ व ८६९८३०३३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.’ असे आवाहन करण्यात आले आहे.