सलग दुसऱ्या वर्षी मिळविला पुरस्कार
पंढरपूर (प्रतिनिधी) - शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेत परिपक्व बनवण्याचा ध्यास घेतलेली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील ‘स्वेरी’ ही शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच अग्रेसर झाली आहे असे नव्हे तर आता क्रीडा क्षेत्रातही स्वेरी आपली चमकदार कामगिरी करत आहे हे मागील कांही वर्षांपासून दिसून येत आहे. नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये स्वेरीच्या अथर्व आनंद शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सोलापूर येथील सुशीलकुमार शिंदे शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी अथर्व आनंद शिंदे यांनी अनुक्रमे ९९,९८,९७,९५,९६ असे टारगेट साध्य करून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सुवर्णपदक मिळवले. या विजयामुळे जानेवारी २०२४ मध्ये कुरुक्षेत्र (हरियाणा) मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अथर्व शिंदे यांची निवड झाली आहे. खेळाची आवड असलेल्या शिंदे यांना सुरवातीपासून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांची सातत्याने प्रेरणा मिळत आहे त्यामुळे अथर्व यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष केंद्रित केले आणि आपले लक्ष्य गाठले. त्यांना स्वेरीचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय मोरे यांचेही मार्गदर्शन लाभले. स्वेरीत अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वतंत्र जीमची सोय झाल्यामुळे विद्यार्थी सरावाला अधिक वेळ देत असल्याचेही दिसून येत आहे. अथर्व शिंदे यांनी रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवल्यामुळे त्यांचा स्वेरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अथर्व यांचे वडील आनंद शिंदे व कार्यालयीन अधीक्षक नागेश ताडे हे उपस्थित होते. रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अथर्व शिंदे यांचे अभिनंदन केले.