टाकळी सिकंदर ता.मोहोळ (प्रतिनिधी) - भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर ता-मोहोळ जि- सोलापुर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पैलवान भिमराव (दादा) महाडिक यांची २८ वी पुण्यतिथी शनिवार दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना कार्यस्थळावरील संस्थापक भिमराव महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
भीमा कारखाना कार्यस्थळावर पुळूजचे लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांनी प्रतिमेस दीप प्रज्वलन केले. पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर (राहुरीनगर) यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत अभिनव पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रम प्रसंगी भीमा कारखाना संचालक, कार्यक्षेत्रातील सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.