मंगळवेढा (प्रतिनिधी) - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आणिकगाव, चेंबूर, मुंबई येथील मुंबई महापालिकेच्या शाळेत वितरित करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून १६ विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी प्रश्न उपस्थित करत राज्यभर असे प्रश्न निर्माण होत आहेत यावरती सरकारचे लक्ष वेधले.
बारा ते तेरा वर्षे वयोगटातील या विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ सुरु झाल्याने त्यांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्या उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? तसेच सदर ठेकेदार अन्नसुरक्षा मानकानुसार पात्र होता का असल्यास या अगोदर असे प्रकार घडले होते का आणि त्यावर कोणती कारवाई करण्यात आली होती?
सदरचा प्रकार पुन्हा घडू नये याकरता शालेय पोषण आहाराची दैनंदिन गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल काय?
असे अनेक सवाल करत आमदार आवताडे यांनी सबंध सभागृहाचे लक्ष वेधले.
योग्य ती चौकशी करून तात्काळ दोषींविरोधात कार्यवाही करून उपाययोजना कराव्यात व लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हेळसांड थांबवावी ही मागणी आज आमदार आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली
असता याची तात्काळ दखल घेत शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांनी प्रश्नांचे निरसण करत संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेवरती ठोस कारवाईबद्दल आश्वस्त केले. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागास पुरवठा होणारे अन्नधान्य चेक करून पुरवठा करण्यासंदर्भात व यावरती योग्य ती अंमलबजावणी करण्यासंदर्भात ग्वाही दिली.
उज्वल भारत देशाचे निर्मितीसाठी उद्याची सजग व सदृढ पिढी घडवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध शैक्षणिक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे मोहीम देशभर राबवत असताना असे प्रकार घडणे सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय धोकादायक असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी आपले विचार मांडत असताना सांगितले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणारा हा प्रश्न आमदार आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात मांडल्याने समाजातील विविध स्तरातून याचे कौतुक होत आहे.