ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग रहावे - तहसिलदार सुशिल बेल्हेकर

0
         पंढरपूर दि.26:-  ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यात आले आहेत.  प्रत्येक ग्राहकाने या कायद्याचा व्यवहारात वापर करायला हवा. यामुळे ग्राहकांचे हित अबाधित राहण्यास मदत होते. ग्राहकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या हक्काबाबत सजग रहावे असे आवाहन तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.
           तहसील कार्यालय पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त ग्राहक मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरवठा निरीक्षण आधिकारी श्रीमती कण्हेरे, निवासी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक  तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
             यावेळी तहसिलदार बेल्हेकर म्हणाले, ग्राहकांमध्ये आपल्या हक्काची जाणीव निर्माण व्हावी याकरीता दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकांने नेहमी सजग राहायला पाहिजे. कोणतीही वस्तु घेतांना काळजीपुर्वक पडताळणी करुन घ्यावी, त्यात वस्तुची किंमत बघणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी वस्तु खरेदी करतांना पक्के बिल घेतले पाहिजे. जेणेकरुन वस्तुत काही दोष त्रुटी राहिल्यास त्याची तक्रार ग्राहक आयोगात करता येईल. कोणत्याही एका वस्तुवर  एक वस्तू फ्री मिळते म्हणून अनावश्यक खरेदी करु नये, ती खरेदी करतांना  योग्य पडताळणी करुनच खरेदी करावी. ऑनलाईन वस्तु खरेदी करतांना प्रत्येकांने काळजी घ्यावी, ई -कॉमर्सद्वारे व्यवहार करतांना नेहमी सतर्क रहावे.असेही तहसिलदार बेल्हेकर यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)