ब्राह्मण समाजाच्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी सर्वत्र निवेदने

0
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ  व इतर मागण्यांबाबत सर्वत्र निवेदने
        पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी शासन दरबारी पडून आहे. आमच्या या रास्त मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था पाहता असंख्य विद्यार्थी केवळ फीज भरू शकत नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे कठीण झाले आहे. तसेच उद्योग व्यवसायासाठी आर्थिक विकास महामंडळाची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा शासनाकडून आर्थिक निकषावर सर्वेक्षण देखील झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत विधिमंडळात मागणीही केली आहे. परंतु आजतागायत आमची ही मागणी प्रलंबितच आहे. आज पर्यंत राज्यात अनेक ब्राह्मण समाजाच्या अनेक श्रेष्ठ मंडळांनी संबंधित मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन शासनाला वारंवार यासंबंधी निवेदने देण्यात आलेली आहेत. धरणे, मोर्चे, आंदोलने, संवाद बैठकाही झाल्या आहेत. यातून काहीही निष्पन्न न झाल्यामुळे जालना येथे आमचे समाज बंधु श्री दीपक भाऊ रणनवरे हे आमरण उपोषणास बसले होते.
         सध्याच्या बदललेल्या परिस्थितीतून दबलेल्या वर्गाला सामाजिक न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक व आर्थिक संधी उत्पन्न होणे गरजेचे आहे. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती होणे हे गरजेचे आहे. ज्यामुळे या दबलेल्या सामाजिक घटकाला शैक्षणिक संधी सोबतच स्वतःचा व्यवसाय, उद्योग उभा करता येऊ शकेल व समाजातील बेरोजगारी सारखा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. ज्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग वाढवण्यास मदत होईल.
         त्याबरोबरच ब्राह्मण समाजाचे जातीय विडंबन थांबवणे व त्यांच्यात सामाजिक सुरक्षितता निर्माण होणे ही काळाची गरज आहे. ब्राह्मण समाजाचे सामाजिक विडंबन थांबविले गेले नाही तर नवीन सामाजिक विषमता जन्माला येणार आहे. शासन महिलांना, अपंगांना व समाजातील असुरक्षित घटकांना विशेष कायदे करून सर्व संरक्षण पुरवते. त्याच धर्तीवर ब्राह्मण समाजावर होणाऱ्या सामाजिक विडंबनापासून त्यांना सुरक्षितता देणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कायदा करून संरक्षण देणे आज गरजेचे आहे.
          वरील बाबींचा विचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खालील प्रमाणे मागण्या मान्य होणे गरजेचे आहे.

          १) ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकांना व्यावसायिक मदतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे व त्यात 1000 कोटींची तरतूद करण्यात यावी.

        २) ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.

        ३) ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे.

       ४) ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5000 रुपये मानधन देण्यात यावे.

      ५) ब्राह्मण समाजातील सेवकांना इनामी जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक या वर्गात बदलण्यात यावी. त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.

       ६) ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करावा.

       ७) मंदिरे ज्या त्या वंशपरंपरागत पुजारी व्यवस्थापनाकडे पूर्ववत हस्तांतरित करण्यात यावी.

          ८) ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांची वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची /आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी.

        अशा मागण्यांचे  निवेदन पंढरपूर येथे आमदार समाधान दादा अवताडे तसेच माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांना ब्राह्मण समाजाच्या वतीने देण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)