अभिलेखांचे मराठी भाषेमध्ये रुपांतर करण्याचे काम प्रगतीपथावर - तहसिलदार सुशिल बेल्हेकर
पंढरपूर:- (दि.18)- पंढरपूर तालुक्यातील 51 गावांमध्ये 2 हजार 945 इतक्या मोडी लिपीतील कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर अभिलेखांचे प्रथम स्कॅनींग करण्यात येणार असुन, मराठी भाषेमध्ये रुपांतर करुन ते प्रमाणित केल्यानंतर स्कॅनींगच्या पी.डी.फ फाईल संबंधीत गांवच्या नागरीकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येणार आहे. सदरचे कामकाज प्रगतीपथावर चालू असल्याचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोडी लिपीतील कुणबी नोंदीचे सर्व अभिलेख ॲड. सुधीर रानडे, ॲड अशुतोष बडवे, ॲड संतोष घाडगे, या मोडी लिपी जाणाकारांमार्फत तपासलेल्या आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 51 गावांमध्ये 2945 इतक्या मोडी लिपीतील कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदरचे अभिलेखाचे कामकाज प्रगतीपथावर चालू असुन, त्याची पी.डी.एफ किंवा नक्कल सद्यास्थितीस उपलब्ध करुन देणे शक्य नाही. याबाबत इंटरनेट मिडीयावर प्रसिध्द झालेल्या कोणत्याही बातम्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच तालुक्यातील नागरिकांना कुणबी दाखला नोंदीबाबत प्रसिध्द प्रत्रकान्वये व ग्रामस्तरावर प्रशासकीय यंत्रणेकडून कळविण्यात येईल.
तालुक्यातील शोधमोहीमेबाबत जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद व उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे विहीत कालावधीत शोधमोहिम राबविलेली आहे. या शोधमोहिमेमध्ये पंढरपूर तालुक्यातील सन 1960 पुर्वीची एकुण 84 गावांमधील (सध्याची 95 गावे) सर्व अभिलेखांतील नोंदीची तपासणी करणेत आली. त्यामध्ये एकुण 5,31,041/- इतक्या मराठी भाषा व मोडी लिपीतील नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी मौजे भोसे, कासेगांव, भाळवणी, अजनसोंड, तावशी या गावांमध्ये मराठी भाषेतील 479 कुणबी नोंद आढळून आलेल्या आहेत. सदर आढळून आलेल्या नोंदींच्या अभिलेखांचे स्कॅनिंग करुन त्याची पी.डी.एफ. गावातील सर्व रहिवाशांना ऑनलाईन प्रणालीवर शासनाचे अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले.