पंढरपूर :- (दि.02)- सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. पंढरपूर तालुक्यात जिल्हा नियोजन, आमदार निधी, आदी माध्यमातून ग्रामीण भागात तसेच शहरात विविध विकास कामे सुरु असून, विकास कामांच्या प्रक्रियेला गती देत विकासकामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील मंजूर व प्रस्तावित असलेल्या विकास कामांबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. हरसुरे, नगर अभियंता नेताजी पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता एस.एच.देशपांडे, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता भीमाशंकर मेटकरी, जि.पचे उपअभियंता एस.एन.लवटे, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, तालुक्यात शासनाच्या सर्व योजनामध्ये सुरु असलेल्या विकास कामांना गती देऊन वेळेत मंजूर निधी खर्च करुन विकासकाम पूर्ण करावेत. ज्या कामासाठी कार्यान्वयीन आदेश देण्यात आलेला आहे परंतु कामकाज अद्याप सुरू करण्यातत आलेले नाही, अशी सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. चालू कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडथळा निर्माण होत असलेल्या तसेच ज्या विकास कामांना स्थगिती दिली आहे त्यांची माहिती देण्यात यावी. विकास कामे करताना संबंधित दोन्ही यंत्रणेने समन्वय साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संबधित सर्व विभागांनी तालुक्यातील विभागनिहाय, कामनिहाय, रक्कम व कामांची स्थिती याबाबत माहिती दि. 03 जानेवारी 2024 पर्यंत तर ग्रामपंचायत कडून येणारे प्रस्ताव व ठराव याबाबतची माहिती दि.5 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी. प्रस्तावित ठरावांच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव दि. 15 जानेवारी 2024 पुर्वी तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात यावेत. प्रस्तावित ठरावास तांत्रिक मान्यता मिळालेनंतर दि. 26 जानेवारी 2024 पूर्वी निवीदा प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी दिल्या. आमदार समाधान आवताडे यांच्या पत्रास अनुसरुन तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्याबाबत बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बांधकाम विभाग, भीमा पाटबंधारे विभाग, महावितरण, नगरपालिका.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुवैद्यकीय विभाग, एस.टी महामंडळ आदी विभागांमार्फत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध कामांचा तसेच पंचायत समितीच्या विविध विभागामार्फत सुरू कामांचाही आढावा प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी घेतला.