पंढरपूर – सनातन लोकांनी समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्माण केलेल्या होत्या. त्यामुळे स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत होते. हे अन्याय दूर करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले. त्यामुळेच आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहे. सावित्रीबाई या लहानपणापासूनच समजूतदार, धाडसी, मनमिळाऊ आणि करारी वृत्तीच्या होत्या. सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपणे हे आधुनिक स्त्रियांचे कर्तव्य आहे.”
असे प्रतिपादन प्रा. सुनिता मगर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या
जयंती निमित्त ‘सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य’ या विषयावर
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब
बळवंत, कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. फैमिदा बिजापुरे आदी मान्यवर उपस्थित
होते.
प्रा. सुनिता मगर पुढे म्हणाल्या की, “भारतीय समाजातील
स्त्रियांवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत. अद्यापही त्यांना
समाजात सन्मानाची वागणूक मिळत नाही. जोपर्यंत समाजात स्त्रियांना समतेची
आणि सन्मानाची वागणूक मिळणार नाही. तोपर्यंत देश स्वतंत्र झाला आहे. असे
म्हणणे धाडसाचे होईल. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या प्रत्येक
सामाजिक कार्यात बरोबरीने सहभाग घेतला. सत्य, परोपकार, ममता हे त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. सावित्रीबाई यांचा वारसा आजच्या प्रत्येक
स्त्रीने चालविला पाहिजे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. फैमिदा बिजापुरे
म्हणाल्या की, “सावित्रीबाई फुले यांनी आपल्या अंगावर शेण, चिखलाचा मारा
सहन केला म्हणून आपल्याला सन्मान मिळतो आहे. आजच्या स्त्रियांच्या
सन्मानाच्या पाठीमागे सावित्रीबाई यांचा त्याग आहे. याचे भान प्रत्येक
स्त्रीने ठेवणे आवश्यक आहे. देशातील पन्नास टक्के स्त्रियांचा समाज हा
विकासापासून दूर होता. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे
महत्त्वाचे साधन आहे. सनातन आणि मागास विचारात गुंतून राहण्यापेक्षा
विज्ञानवादी विचारांचा वारसा स्त्रियांनी सांभाळला पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती सुडके यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. वर्षा गारोळे यांनी करून दिला. कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
चंद्रकांत खिलारे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा. भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार नेहतराव, अभिजित जाधव, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी
उपस्थितांचे आभार प्रा. वनिता जगताप यांनी मानले.