क्रेडाईमुळे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांना मिळाली महत्त्वपूर्ण माहिती
पंढरपूर (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक स्वप्न असते ते म्हणजे आपले स्वतःचे हक्काचे घर व्हावे याच घराच्या बाबत क्रेडाईच्या माध्यमातून विविध माहिती सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या समोर उपलब्ध करून देण्यात क्रेडाईला यश आल्याचे दिसून आले. पंढरपूर क्रेडाईच्या वतीने रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या गृह उत्सव २०२४ प्रदर्शनास तीनही दिवस पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला.
घर बांधण्यामाठी लागणाऱ्या विविध वस्तू, रो हाऊसेस, बंगलो, फ्लॅट आदी बाबत तसेच जागा व गृहकर्ज याची माहिती एकाच छताखाली नागरिकांना घेता आली.
यासाठी पंढरपूर क्रेडाईच्या वतीने गृह उत्सव २०२४ चे आयोजन १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत केले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले. क्रेडाई ग्रह उत्सव साठी पुणे येथील शांतीलाल कटारिया, सुनील फुरडे, पंढरपूर क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर, उपाध्यक्ष आशिष शहा सचिव मिलिंद देशपांडे खजिनदार संतोष कचरे, पी आर ओ विवेक परदेशी यांच्यासह पदाधिकारी यांनी तीन दिवस मेहनत घेऊन गृह उत्सव यशस्वी करण्यात यश मिळवले.
नागरिकांना घर बांधण्याअगोदर विविध प्रकारची माहिती आवश्यक असते. याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना दिली जात आहे. सध्या घर बांधणीचे स्वप्न प्रत्येक नागरिक पहात आहेत. अशा सर्वसामान्य नागरिकांना या प्रदर्शनाचा फायदा झाला आहे.
पंढरपूरच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. वाराणसीच्या धरतीवर पंढरीचा विकास शक्य होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला होता.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शन व विक्री शिबिरास पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेट देऊन माहिती घेतली.
या शिबिरामुळे आपल्या हक्काचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांना महत्त्वपूर्ण माहिती घेता आल्याचे भेट दिलेल्या नागरिकांतून सांगण्यात आले.