केबीपी कॉलेजमध्ये एनसीसीचे दिमाखदार परेड संचलन

0
एनसीसी विभागातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

           पंढरपूर (प्रतिनिधी) - "भारतातील लोकशाही ही जागतिक स्तरावरील एक आदर्श लोकशाही असून  देशाने स्वातंत्र्योत्तर काळात मोठय़ा प्रमाणात प्रगती साधली आहे.  देशातील विविधता सांभाळून देखील ऐक्य टिकवण्यामध्ये देश यशस्वी ठरला आहे.  भारतीय संविधान हे आदर्शवत आहे. सर्वांना समान न्याय,  समता, बंधुता आणि स्वातंत्र्य बहाल करते. शैक्षणिक क्षेत्रात देशाने केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. शिक्षण,  आरोग्य, वाहतूक आणि दळण वळण यात देशाने केलेली प्रगती ही वैशिष्टय़पूर्ण आहे."असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे यांनी केले. 
             रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांमध्ये  ते मनोगत व्यक्त करत होते. या कार्यक्रमात 'एनसीसी'च्या छात्र सैनिकांनी पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजास गार्ड सलामी दिली. त्याचबरोबर एनसीसी विभागामार्फत  महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दिमाखदार परेड संचलन करण्यात आले.  यामध्ये एनसीसीचे चार प्लाटून सहभागी झाले होते. महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये एकूण  एकशे सात छात्र सैनिक दरवर्षी प्रशिक्षण घेत असतात यामध्ये एकूण चौपन्न मुले आणि त्रेपन्न मुली यांचा सहभाग असतो.
         प्रजासत्ताक दिन परेड संचलन यशस्वी करण्यासाठी पंधरा दिवसापासून महाविद्यालयातील एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. समाधान माने यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्स सराव करीत होते. या संचलनामध्ये एनसीसीच्या छात्र सैनिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. जूनियर अंडर ऑफिसर गणेश साळुंखे याने परेड कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर सीनियर अंडर ऑफिसर तुकाराम गाजरे, सीनियर अंडर ऑफिसर वैष्णवी चव्हाण, जुनिअर अंडर ऑफिसर महेश आसबे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अक्षदा कदम आणि जुनिअर अंडर ऑफिसर मनीषा गुंड या सर्व कॅडेट्सनी वेगवेगळ्या प्लॅटूनचे नेतृत्व केले. कॅडेट समाधान जगताप याने गार्ड कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली.
            एनसीसी विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. महाविद्यालयातील एनसीसी विभागातील कॅडेट दरवर्षी भारतीय सैन्यामध्ये भरती होत असतात. त्याचबरोबर विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कॅम्पसमध्ये महाविद्यालयातील एनसीसी छात्र आपला सहभाग नोंदवत असतात. 
        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. समाधान माने, आय. क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.अमर कांबळे, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ.  मधुकर जडल, रुसा समन्वयक प्रा. योगेश पाठक, रुसा सहसमन्वयक डॉ चंद्रकांत काळे, उपप्राचार्य डॉ भगवान नाईकनवरे, डॉ बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ अनिल चोपडे, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी, त्याचबरोबर महाविद्यालयातील सीनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील शिक्षक, शिक्षकेतर व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी,  विद्यार्थिनी व सेवानिवृत्त सेवक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी चे माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)