कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये “दीपस्तंभ मनातले, जनातले” विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - आराम व आळस हेच माणसांचे प्रमुख शत्रू आहेत. मोबाइल व सोशल मेडियाच्या अतिरिक्त वापरामुळे वाचन संस्कृति लोप पावत चालली असून माणूस यंत्रामद्धे गुरफटत चालला आहे. तसेच प्रत्येक माणसाचे समाजाशी काही देणे असते. समाजामध्ये अश्या अनेक सामाजिक संस्था आहेत की ज्या समाजातील वंचित, दुर्लभ घटकांसाठी निस्वार्थ हेतूने काम करीत असतात. त्या संस्था च खर्या दीपस्तंभ आहेत. त्यांना आपण आपल्या परीने मदत करून समाजाची उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत प्रसिद्ध लेखक, कवि, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित, कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी व पालवी संस्कार सेतु पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी इंस्टीट्यूटमध्ये दि ९ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या “दीपस्तंभ मनातले जनातले” या तरुणांसाठीच्या हृदयस्पर्शी संवादामद्धे ते बोलत होते. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी बोलताना उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह प्रा. डॉ. मिलिंद परिचारक म्हणाले की प्रा. प्रवीण दवणे सरांसारख्या व्यक्तींची, विचारांची समाजाला गरज आहे. तसेच वाचन, संगीत यासारखे छंद माणसायला का जगायच हे शिकवतात असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन परिचारक यांनी प्रा. प्रवीण दवणे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपणसमोर येऊन मार्गदर्शन करीत आहेत हे आपले भाग्य आहे असे सांगून सरांनी केलेले मार्गदर्शन व त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब करण्याविषयीचे आवाहन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, पालवी संस्थेचे आशिष शहा व डिंपल घाडगे तसेच कर्मयोगी डिग्री व पॉलिटेक्निक विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रा. भारत घोडके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.