पंढरपूर (प्रतिनिधी) - सुरक्षित वाहन चालवून प्रवाशांची काळजी घेणे, त्याचबरोबर इंधन बचत करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन राज्य परिवहन महामंडळाचे यंत्रअभियंता विवेक लोंढे यांनी केले.राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारामध्ये इंधन बचत महिना व रस्ते सुरक्षा अभियान या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून तंत्रनिकेतनचे प्रा.बबन घाडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते हे होते. तर अध्यक्षस्थानी आगार प्रमुख मोहन वाकळे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व "इंधन बचत महिना" या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.बबन घाडगे यांनी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याबद्दल तंत्रशुद्ध व सूक्ष्म माहिती दिली, त्याद्वारे इंधनाची बचत करणे व सुरक्षित वाहन चालवणे कसे शक्य आहे याचेही अभ्यासपूर्ण विवेचन केले.याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या माफक अपेक्षा म्हणजे स्वच्छ बस, व्यवस्थित आसन व्यवस्था, सुस्थितीतील खिडक्या,दरवाजे याबरोबरच प्रदूषणमुक्त वाहन याद्वारे सुखकर प्रवास या आहेत. तसेच सुरक्षित वाहन चालवून प्रवाशांची काळजी घेणे हेही महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
इंधन बचत ही काळाची गरज आहे, भूगर्भातील इंधन साठे संपण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे उपलब्ध आहे ते इंधन जपून वापरणे हे आपल्या हातात आहे.तेव्हा कमीत कमी इंधन वापरून, जास्तीत जास्त अंतर वाहन चालविणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले. याप्रसंगी चांगले केपीटीएल देणाऱ्या चालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. यावेळी स्थानक प्रमुख पंकज तोंडे, तसेच चालक,वाहक, यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक नागनाथ दळवे यांनी केले तर आभार कार्यशाळा प्रमुख विजय घोलप यांनी व्यक्त केले. या समारंभासाठी वरिष्ठ लिपिक सुमित भिंगे, विजय कुंभार, वाहतूक नियंत्रक जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.