‘कर्मवीर मधील कवी संमेलनात रसिक श्रोते मंत्रमुग्ध’

0
KBP कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

पंढरपूर (प्रतिनिधी) –
   “धाव रे विठ्ठला गाभाऱ्यातूनी,
   थेंब होवूनी तू सांड रानातूनी,
   तू उभा ठेवूनी हात कमरेवरी,
   पाहसी का असा अंतरे श्रीहरी,
   हाक येई तुला पाना पानातूनी,
   थेंब होवूनी तू सांड रानातूनी”
       या कवी ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या काव्यपंक्तीने मराठी कविता रसिकांची मने जिंकली, सर्व श्रोतावृंद मंत्रमुग्ध झाला. अशा एकाहूनी एक कवितेने श्रोतावर्ग काव्यरसात डुंबून गेला. प्रेम कविता, भक्ती कविता, श्रम कविता, कृषी कविता, निसर्ग कविता अशा विविध कवितांनी कवींनी उपस्थित श्रोत्यांना प्रतिमा, प्रतिभा आणि कल्पनेच्या विश्वाची सफर घडविली. निमित्त होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे. 
         रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी साहित्य परिषद पंढरपूर शाखेच्या सामंजस्य करारांतर्गत ‘काव्यसंमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. या काव्यसंमेलनात कवी हरिश्चंद्र पाटील, कवी संभाजीराव अडगळे, कवी ज्ञानेश्वर डोंगरे, कवी सुनील जवंजाळ, कवी सूर्याजी भोसले, कवी भास्कर बंगाळे, कवी दत्ता तरळगट्टी, कवी गजानन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 
     कवी सूर्याजी भोसले यांनी सादर केलेल्या ‘जेंव्हा तुझ्या ओढणीत, माझा हात गुंतला’ या प्रेम कवितेस विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कवी संभाजीराव आडगळे यांनी ‘माझी माय’ नावाची कविता सादर केली. या कवितेने उपस्थितांना वात्सल्य भावनेने तृप्त केले. कवी दत्ता तरळगट्टी यांनी ‘साठीतला हिवाळा’ ही निसर्ग कविता सादर केली. या कवितेतून मानवी भावभावनांचे हृदयस्पर्शी चित्रण पहायला मिळाले. कवी हरिश्चंद्र पाटील यांच्या “गावात माणुसकीचा ठाव राहिला नाही, माणूस आहे असा गाव राहिला नाही, गाजले गावात फड कुस्त्यांनी, नाचते तिथे आता मस्तानी” या कवितेने बदलत्या सामाजिक परिस्थितीचे हृदयद्रावक चित्रण मांडले. कवी सुनील जवंजाळ यांनी ‘तू आहेस तरी कोण’ ही गूढ गुंजानात्मक कविता सादर केली. तर त्यांच्याच ‘आई तुझ्या हातामध्ये खुरप्याचा भार गं, भार गं , माझ्या जीवाला आधार गं’ या कवितेने कृषी जीवनाचे चित्रण केले. कवी भास्कर बंगाळे यांनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन आणि कार्याची महती सांगणारी ‘जन्मले कर्मवीर जन उद्धारा’ ही कविता सादर केली. तर कवी गजानन गायकवाड यांनी ‘मजा राहिली नाही’. 
      अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “कविता हा अल्पाक्षरी साहित्य प्रकार आहे. मात्र त्यात भावनांचा गर्भित अर्थ व्यापकपणे दडलेला असतो. कविता ऐकल्याने मनाचे समाधान होते. आपल्या मराठी कवितांनी भाषेचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले आहे. भावना हा कवितेचा आत्मा असतो. कवीच्या भावनांची गुंफण शब्दातून पहायला मिळते.”
          या काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. राजाराम राठोड यांनी केले. तर सर्व कवींचा परिचय आणि स्वागत प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, सिद्धार्थ ढवळे सर, साहित्यिक सीताराम सावंत, सिनिअर, जुनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दत्ता डांगे, प्रा. हरिभजन कांबळे, डॉ. सुमीत साळुंखे, ओंकार नेहतराव, अमोल माने, अभिजित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी मानले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)