पांचाळ समाजातील १५१ गरजू मुलांची नावनोंदणी
राज्यस्तरीय सामुदायिक मोफत मुंजीकरीता अक्कलकोट नगरी सज्ज
अक्कलकोट जि. सोलापूर (प्रतिनिधी) :- मा. चंद्रकांत दादा वेदपाठक व संपूर्ण वेदपाठक परिवार आयोजित पांचाळ समाजातील १५१ गरजू मुलांचे राज्यस्तरीय सामुदायिक मोफत मुंजीकरीता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून नांवे आली असून आजपर्यंत झालेल्या राज्यातील उपनयन संस्कारातील नांव नोंदणीची ही सर्वोच्च नोंदणी आहे. मुंजीकरीता अक्कलकोट नगरी सज्ज असून कार्यक्रमाची तयारी अंतीम टण्यात आली आहे." अशी माहिती आयोजक पत्रकार चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली आहे.
सप्टेंबर २०२३ पासून सदर मोफत मुंजीचे आयोजनाबाबत सर्व वृत्तपत्रात व सोशल मिडीयावर माहिती प्रसिध्द करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२३ अखेर १२५ मुलांची नोंदणी झाली होती. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे पालकांनी आपल्या मुलांची नांवे नोंदवत १५१ मुलांच्या नोंदी केल्या असून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभल्याने नांव नोंदणीचा हा एक विक्रमचा म्हणावा लागेल.
११ फेब्रुवारी २०२४ रोजी अक्कलकोट एस. टी. स्टैंड समोरील श्री. मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात चंद्रकांत वेदपाठक परिवाराच्या वतीने मोफत मुंजीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११.१७ वा. अक्षता सोहळा पार पाडणार आहे. सदर भव्य दिव्य अशा या उपनयन संस्कार सोहळ्यासाठी, स्वागत समिती, उपनयन संस्कार विधी सोहळा समिती, भोजन समिती, सत्कार समिती, व्यवस्थापन समिती, देखरेख समिती, मिरवणूक समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अशी माहिती विठ्ठल वेदपाठक व सुरेश वेदपाठक यांनी दिली आहे.
वेदपाठक परिवाराच्या वतीने यापुर्वी ८ मे १९९६ रोजी १०१ मुलांचे मोफत मुंजीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंजीकरीता सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, अहमदनगर, संभाजीनगर आदी जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यातील तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यातील पांचाळ समाजातील सोनार, सुतार, लोहार, मुर्तीकार, तांबट या विश्वकर्मा यांच्या पांच पुत्रांच्या मनु, मय, त्वष्टा, शित्पी, दैवत या शाखेतील पालकांनी आपल्या मुलांची नांवे मुंजीकरीता नोंदणी केल्याची माहिती अनिल वेदपाठक व यजमान आकाश वेदपाठक यांनी दिली आहे.
उपनयन संस्कार विधी व धार्मिक विधी कार्यक्रमाची सुरूवात ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्या पासून सुरूवात होणार असून उपनयन संस्कारात सहभागी होणाऱ्या बटू व त्यांच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती वेदपाठक परिवारांनी केली आहे.