पंढरपूर (प्रतिनिधी) - "मराठी पाऊल पडते पुढे" या मराठमोळ्या कार्यक्रमाने महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा, महान राष्ट्रीय महामानवानी दिलेला महान सांस्कृतिक वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी माणसाने सातत्याने आग्रही राहून माय मराठीची उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे. या हेतूने हा "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी चालीरिती, परंपरा, मराठी माणसांची शौर्यगाथा, शेतकरी कष्टकरी यांचे जीवनमान तसेच महाराष्ट्रामध्ये रुजलेली लोकगीते, अभंग, महापुरुषांची यशोगाथा, पोवाडे ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालत आलेले जात्यावरची गाणी, संपूर्ण गावाला जागे करणारे वासुदेव गीते, कोळीगीते, भावगीते, भक्तीगीते अशा विविध कलागुणांनी भरलेली महाराष्ट्रातील मातीमध्ये रुजलेली अशी गाणी "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमामधून या भारत कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करण्यात आली.
या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसिलदार सचिन लंगुटे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले आदी विविध क्षेत्रातील अधिकारी व मान्यवर वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाला पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, कष्टकरी, सुशिक्षित, मध्यमवर्गीय सर्व स्तरातील प्रेक्षकांनी तसेच महिलांनी बाळ गोपाळ यांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने युवक नेते भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.