पंढरपूर – “एकविसावे शतक हे आव्हानाचे शतक असून ते विद्यार्थ्यांनी स्वीकारले पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले लिहिता, बोलता, वाचता आले पाहिजे. त्याचबरोबर विचार करता आला पाहिजे. उपलब्ध ज्ञानाचा जीवनात उपयोग करून आपले जीवन सुखकर करता आले पाहिजे. मोठेपणा हा कृतीतून व्यक्त होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी कृतीतून नवीन समाज घडविण्यासाठी सज्ज असले पाहिजे. समाजाप्रति असलेली भावना व नाते दृढ असले पाहिजे. एका रात्रीतून आयुष्य घडत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रमाची आवश्यकता असते.” असे प्रतिपादन जळगाव येथील हेरीटेज फौंडेशनचे संचालक भुजंग बोबडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने सामंजस्य करारांतर्गत आयोजित ‘एकविसाव्या शतकातील युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
भुजंग बोबडे पुढे म्हणाले की, “शिक्षणातून माणूस घडला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मूल्य शिक्षण, नीती शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणातून ज्ञानासोबत संस्कारही घेतले पाहिजेत. सध्या विद्यार्थी मोबाईलवर सर्वात जास्त वेळ खर्च करत आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ करिअरच्या संबंधीच केला पाहिजे. सध्या समाजातील माणुसकी लोप पावत आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याची तरतूद सरकारने स्वीकारली आहे. मात्र या बदलाचा विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्त्व घडविण्यासाठी लाभ घेतला पाहिजे. स्वत:चा आत्मिक विकास ही सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. याचे गमक विद्यार्थ्यांनी जाणले पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. हनुमंत लोंढे यांनी करून दिला. या कार्यक्रमात हेरीटेज फौंडेशन जळगाव व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे, प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. राहुल मुसळे, प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. बाळासाहेब गायकवाड व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. कल्याण वाटाणे यांनी मानले.