पंढरपूर दि. 12:- माघ एकादशी 20 फेब्रुवारी रोजी असून, या माघवारी कालावधीत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सद्यस्थितीत पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने दि. 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी शहरात दररोज पाणी पुरवठा सुरु ठेवण्याबाबत नियोजन करावे. तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी आवश्यक सूचना फलक लावावेत अशा सूचना प्रांताधिकारी बी.आर माळी यांनी दिल्या.
माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, अपर तहसीलदार तुषार शिंदे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ महेशकुमार सुडके, डॉ. प्रसन्न भातलवंडे, नायब तहसीलदार वैभव बुचके, उप अभियंता भीमाशंकर मेटकरी, बलभीम पावले यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नगरपालिकेने नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी, मंदीर परिसरात अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे.येणाऱ्या भाविकांना व शहर वासियांना वारी कालावधीत व वारी नंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोडवरती कायम अमिक्रमण पथकांची उपलब्धता ठेवावी. शहरातील अतिक्रमणे काढावीत. आरोग्य विभागाने वारी कालावधीत वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी त्या मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी त्याचबरोबर पुरेसा आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात. मंदीर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी पत्राशेड, दर्शनबारी व दर्शन मंडप येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी माळी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले म्हणाले, वाळवंट, पार्किग, महाव्दारघाट तसेच ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अशा ठिकाणी भाविकांना वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यासाठी लाऊड स्पिकरची व्यवस्था करावी. मंदीर परिसरात सेल्फी पाँइट करु नयेत जेणेकरुन भाविक एका जागी थांबून गर्दी होणार नाही. आवश्यक ठिकाणी नदी पात्रात बॅरेकेटींग करावे. आरोग्य विभागाने पत्राशेड व नदीपात्रात सर्व सुविधायुक्त आरोग्य कक्ष उभारावेत. महावितरण विभागाने सुरक्षित व अखंड वीज पुरवठा सुरु ठेवावा. बैठकीत माघी वारी कालावधीत भाविकांसाठी नगरपलिका प्रशासनाने केलेल्या व करण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची माहिती उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर यांनी दिली.
यावेळी प्रांतधिकारी माळी यांनी सार्वजनिक बांधकाम, एस.टी.महामंडळ, तहसिल, उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, पाटबंधारे आदी विभागांचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.