प्रत्येक वारीला वारकरी मंडळींना होतो नाहक त्रास....
पंढरपूर (प्रतिनिधी) - माघी यात्रा तोंडावर आली असताना असंख्य दिंड्या हरि नामाचा गजर करीत पंढरपूर क्षेत्री येत असतात. त्यांना निवासासाठी 65 एकर येथे प्रशासनाने सोय केलेली असते. यात्रा नियोजन करताना वारकरी मंडळींना 65 एकर प्लॉट वाटपचा खूप त्रास होत आहे.
प्लॉट वाटपासाठी सर्व दिंडी प्रमुख यांना दि. 14-02-2024 रोजी फॉर्म भरण्यासाठी व प्लॉट वाटपसाठी बोलावले होते. पण प्लॉट वाटप केले नाही. सर्व दिंडी प्रमुख आपापली पालखी, दिंडी सोडून त्यांचेकडे पंढरपुरला आले होते. तिथे कसलीच तयारी नव्हती. साधा एक टेबल सुद्धा नव्हता. दि. 15-02-2024 रोजी प्लॉट वाटप केले जाईल असे आश्वासन दिले होते. त्याही दिवशी दुपार पर्यंत कसलीच हालचाल प्रशासन करत नव्हते; असे वातावरण पंढरपूर 65 एकर मध्ये दिसत होते. बहुतेक तेथील अधिकारी हे हिंदु विरोधी आहेत असा संशय येत आहे. कारण हा त्रास प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक वारीला होत आहे. परंतू याची कुणीच दखल घेत नाही. याबाबत लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे निवेदन दिले आहे. तरी हा त्रास बंद होत नाही.
वारकरी हे संस्कृती, परंपरा सांभाळण्यासाठी दिंडी काढतात. पंढरीतील प्रशासन हे भाविकांना नाहक त्रास देत आहे. हा त्रास सहन होत नसल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून माघ शुद्ध दशमी दि. 19-02-2024 रोजी सकाळी 9.30 वा. 65 एकर पंढरपूर समोर ठिय्या व भजन आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली.