केरळ येथील राजागिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची मधील संपर्क अधिकारी यांचे प्रतिपादन
पंढरपूर (प्रतिनिधी) – “महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे. त्यांनी करणी, भानामती आणि चमत्कार करणाऱ्या बुवा आणि बाबांपासून दूर राहिले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आपणास आज सन्मानाची वागणूक मिळत आहे. याची जाणीव ठेवून आपण शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. चांगले शिक्षण आणि श्रम करण्याची सवय हिच आपल्या मुलाबाळांना यशापर्यंत घेवून जाणार आहे. समाजातील चांगल्या कामासाठी पैसा आपोआप उभा राहतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांना चांगल्या पुस्तकाशी मैत्री करायला भाग पाडा.” असे प्रतिपादन केरळ येथील राजागिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची मधील संपर्क अधिकारी वर्षा चोपडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती, लैंगिक छळ आणि शोषण प्रतिबंधात्मक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत ‘जागतिक महिला दिन समारंभा’त प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथील डॉ. वर्षा काणे या होत्या.
वर्षा चोपडे पुढे म्हणाल्या की, “मुलांनी नेहमी आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आई वडील हे मुलांच्या हितासाठी राबत असतात. स्त्रियांनी स्वत:च्या घराचा विकास करण्यासाठी कष्ट घ्यावेत. खोट्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागू नये. मुलांना नेहमीच चांगल्या कामासाठी प्रेरित केले पाहिजे. त्यांच्या मध्ये खूप शक्ती असते. त्याचा योग्य उपयोग केला तर नक्कीच फायदा होईल. समाजात चांगल्या लोकांची संख्या वाढवायची असेल तर सर्वाना शिक्षण दिले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. वर्षा काणे म्हणाल्या की, “निसर्गाने स्त्रियांना आकाशाची विशालता, सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, वायूची चंचलता आणि सागराची गहनता दिली आहे. स्त्री म्हणजे शक्तीचे साक्षात रूप असते. त्यामुळे आजवर स्त्रियांच्या संबंधी केलेल्या व्याख्या बदलणे गरजेचे आहे. स्त्रियांकडे असणारी मातृत्त्वाची शक्ती ही अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात स्त्री यशस्वी होत असते. याची जाणीव ठेवून स्त्रियांनी स्वत:ला विकसित केले पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकात खिलारे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. नेहा देसाई यांनी करून दिला. या कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिना’निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, वक्तृत्त्व, कविता वाचन आणि गायन या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापक यांचा बक्षिसाची रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचा पेन आणि डायरी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिता मगर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रोफे. डॉ. फैमिदा बिजापुरे यांनी व्यक्त केले.