मुंबई (प्रतिनिधी) - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी (11 मार्च) रोजी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'आनंदाचा शिधा' वितरणाचा निर्णय घेण्यात आला.
आता हा आनंदाचा शिधा 1 कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये खर्च येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि 7.5 लाख शेतकरी या आनंदाच्या शिध्याचा लाभ घेणार आहेत.
शिधापत्रिकाधारकांना मिळणार'आनंदाचा शिधा'
या आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखऱ आणि 1 लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे. या सर्व पदार्थांचा संच प्रतिशिधापत्रिका धारकास देण्यात येणार आहे. दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणाच्या निमित्ताने राज्यातील गरीब आणि गरजू शिधापत्रिकाधारकांना'आनंदाचा शिधा' देण्यात येतो.
काल मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसंच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा योजना
महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केलेली आहे. आनंदाचा शिधा या नावाच्या फूड किटमध्ये प्रत्येकी 1 किलो खाद्यतेल, रवा, चणा डाळ आणि साखर 100 रुपये किमतीत मिळते. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा शिधा दिला जात आहे.