कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या विविध पुरस्कारांची महाजन-बडवेंकडून घोषणा
पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील विख्यात कलासाधना सांस्कृतिक मंडळाचा २०२४ चा ‘पंढरी कलारत्न’ पुरस्कार यंदा अमेरिका स्थित वेदाचार्य संदीप कापसे गुरूजींना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे प्रमुख श्रीकांत महाजन-बडवे यांनी आज पंढरपुरात केली.
सन्मान चिन्ह, महावस्त्र, रोख रक्कमेची थैली आणि गौरव असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येथील खवा बाजारातील दि पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात रविवारी दि. १७ रोजी सायंकाळी ५-३०.. वाजता हा पुरस्कार दिमाखदारपणे प्रदान करण्यात येणार असल्याचेही महाजन-बडवे यांनी यावेळी सांगितले.
कलासाधना ही गत १६ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या कला-साहित्य-संस्कृती या विश्वात कार्यरत आहे, असे स्पष्ट करून श्री. महाजन-बडवे म्हणाले, पंढरपुरात जन्मलेले परंतु येथून बाहेर जात विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या, करत असलेल्या मान्यवरांना ‘पंढरी कलारत्न’ हा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येत असते. त्यानुसार यंदाचा पुरस्कार कापसे गुरूजींना देण्यात येत आहे. श्री. कापसे गुरूजींनी आयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाप्रसंगी पौरोहित्याची जबाबदारी पार पाडली आहे. त्या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणूनही त्यांचा सहभाग होता. वैदिक क्षेत्रात कापसे गुरूजींची देश-विदेशात उत्तुंग कामगिरी आहे.
दरम्यान, पंढरपूरसह आसपासच्या परिसरात ज्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांना कलासाधना विशेष गुणवत्ता पुरस्काराने कलासाधना संस्थेकडून गौरविण्यात येते. त्यानुसार यंदाचे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करत असल्याची माहितीही श्री. महाजन-बडवे यांनी दिली.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार आटकळे, राजेंद्र माळी, अक्षय बडवे, ज्ञानेश्वर मोरे, डॉ. किरण बहिरवाडे, अमरसिंह चव्हाण, अनंत नाईकनवरे, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अभिराज बडवे, जगदीश खडके, राजकुमार शहा, अनिरुद्ध बडवे पाटील, अमृतभाई पेनूरकर, राजकुमार शहा, महेश देशपांडे, प्रा. राजेंद्र मोरे,जगदीश खडके, सौ. मंजिरी देशपांडे, सौ. आरती बोरखेडकर, सौ प्रतिभा यादव, यांच्यासह कलासाधना संस्थेचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत
--------------------------------------------------
‘कलासाधना’ विशेष गुणवत्ता पुरस्काराचे मानकरी
आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ही स्पर्धा जिंकलेल्या तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन गिनीज वल्ड बुकमध्ये तीन वेळा नाव आलेल्या सौ. प्रीती मस्के, अध्ययन व अध्यापान भरीव कार्याबद्दल प्रा. मंदार परिचारक, दुर्मीळ पक्षांच्या प्रजातींच्या संशोधनाबद्दल डॉ. अभिजित माचणूरकर, ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल डॉ. संतोष वलगे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुपरवायझरपदी निवड झाल्याबद्दल वैभव विद्याधर बडवे, ज्योतिष शास्त्रात पीएच.डी. केल्याबद्दल विष्णुप्रिया वाडेकर.
--------------------------------------------------
‘पंढरी कलारत्न’पुरस्काराचे यापूर्वीचे प्राप्तकर्ते
ज्येष्ठ साहित्यिक (कै.) द. मा. मिरासदार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री तथा दिग्दर्शक मधुगंधा कुलकर्णी, शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर,अष्टपैलू लेखक, पत्रकार संजयजी पाठक, रेखांकार श्रीपाद सावळे, चित्रकार प्रकाश कोर्टीकर, मूर्तिकार (कै.) हरिश्चंद्र सावंत, सिनेदिग्दर्शक तानाजी घाडगे, , जयसोनिक या विविध ताल वाद्याचे जनक जयवंत उत्पात.
--------------------------------------------------