संशोधन, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

0
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

        पंढरपूर (प्रतिनिधी) – “गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही. गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो. संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा सहभाग हा महत्त्वपूर्ण असून महाविद्यालयाची वाटचाल अभिमत विद्यापीठाच्या दिशेने सुरु आहे.” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. 
             रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. जे. जे. जाधव, डॉ. राजेंद्र जाधव, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे , उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, पर्यवेक्षक युवराज आवताडे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते. 
            कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर पुढे म्हणाले की, “विद्यापीठ कला, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ राबवत असलेल्या प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या विकासात शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटक उपयुक्त असतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे.”
         कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “खेळाडू हे मैदानावर आपले कसब दाखवत असले तरी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. खिलाडूवृत्ती ही जीवनासाठी महत्त्वाची असते. नम्रता, विनयशीलता आणि संयम या बाबी आपणास चैतन्य निर्माण करून देतात. ‘रयत’मध्ये असणारी शिस्त विद्यार्थ्यांना वेगळे संस्कार देवून जातात. हे संस्कार आणि शिस्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतात.” 
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अमर कांबळे यांनी करून दिला. या कार्यक्रमात राष्ट्रीय, राज्य आणि विद्यापीठ पातळीवर  कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जिमखाना विभागाचा अहवाल क्रीडा संचालक डॉ. सचिन येलभर यांनी सादर केला. शैक्षणिक, संशोधनात्मक व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या गुणवंत प्राध्यापक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 
         या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर व व्यावसायिक कौशल्ये अभ्यासक्रम विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व डॉ. प्रशांत नलावडे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)