पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची रसिकश्रोत्यांच्या उदंड प्रतिसादात सांगता
पंढरपूर (प्रतिनिधी) - तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आणि मनमाडकर परिवार पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. आज या दोनदिवसीय संगीत महोत्सवाची सांगता झाली.
सुरुवातीला पं.वसंत मराठे, पं. हेमंत पेंडसे, सौ.रश्मीताई अभिषेकी, श्री भगवान भाऊ मनमाडकर, सौ.शुभांगीताई मनमाडकर, उस्ताद झाकीर हुसेन यांचे पुतणे आणि उस्ताद तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र शिखरनाद कुरेशी, अभेद शौनक अभिषेकी, पं.मधुकर धुमाळ, श्रेणीक दोशी, उदय उत्पात, एस. पी. कुलकर्णी, संयोजक ज्ञानेश्वर दुधाणे प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून पं. शौनक अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य अभेद अभिषेकी यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरुवातीला राग शुध्द कल्याण व झुमरा तालात आणि राग अभोगी अतिशय सुंदर सुरेख गायन करत... अभिषेकी बुवांची तिसरी पिढी अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्यासाठी तयार असून निश्चितच शास्त्रीय संगीताला चांगले दिवस येणार याची जाणीव झाली. त्यांना तितकीच सुंदर अप्रतिम साथसंगत तबला गीत इनामदार हार्मोनियम अमेय बिच्चू, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ धनंजय मनमाडकर यांनी दिली.त्यानंतर ख्यातनाम जंबेवादक शिखरनाद यांनी या आफ्रिकन वाद्यावर तबल्याची भाषा लीलया वाजवत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन सोडले. यांनी आपल्या वादनातून एकेक एकेक कायदे, रेले, उलगडत उलगडत शिखरनादही आपल्या परंपरागत सांस्कृतिक जपत आगळ्यावेगळ्या वाद्यांची भूरळ तरुणाईला आकर्षित करणारं एवढं मात्र नक्की. त्यांना अप्रतिम संयमी लेहरा साथसंगत अमेय बिच्चू यांनी दिली. यानंतर अभेद अभिषेकी यांनी सगुण संपन्न पंढरीचा राजा, अभंग सादर करत अप्रतिम तराणा गाऊन भैरवीने कार्यक्रमाची सांगता करत रसिकांना मंत्रमुग्ध करत अविस्मरणीय क्षणाची अनुभुती दिली. सुंदर सुत्रसंचलन राजेश खिस्ते यांनी केले तर आभार आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मानले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी स्पॉन्सर जोतीचंद भाईचंद सराफचे श्रेणिक दोशी, हॉटेल महावीर रसोईचे राहुल पुरवत, विनायक परिचारक क्लासेस यांनी अनमोल योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, धनंजय मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे, माधुरी जोशी, स्वानंदी काणे, निता कुलकर्णी, वैभव केंगार, तुकाराम दुधाटे, सोमा रणपिसे, देवकी दुधाणे, अंजली टकले, आरती मनमाडकर, उमेश केसकर, राजेश खिस्ते, अनेक पंढरपूरकर कलासाधकांचे आणि कलारसिक श्रोत्यांचे सहकार्य लाभले.